Dussehra 2020: दसऱ्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विजयादशमीच्या जनतेला शुभेच्छा
Uddhav Thackeray, Ajit Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

देशभरात 17 ऑक्टोबरपासून सुरु असलेल्या नवरात्रीच्या (Navratri 2020) उत्सवाची उद्या, 25 ऑक्टोबर रोजी सांगता होत आहे. उद्याच्या दिवस विजयादशमी दसरा (Dussehra 2020) म्हणून साजरा केला जाईल. या दिवसाचे औचित्य साधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) व उप मुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘विजयादशमी म्हणजे संकटावर, वाईट प्रवृत्तीवर विजय मिळविण्याची प्रेरणा. यंदाच्या या विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या उत्सवातून सीमोल्लंघन करून विजय खेचून आणण्याची प्रेरणा घेत आपण एकजुटीने कोरोना विषाणूरूपी रावणाचा नाश करूया.’ असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

कोरोना संकटावर मात करून महाराष्ट्र नव्या जोमाने भरभराट आणि समृद्धीकडे वाटचाल करेल, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दसऱ्याच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत. ते पुढे म्हणाले, ‘उद्या विजयादशमी अर्थात दसऱ्याचा उत्सव साजरा करणार आहोत. दसरा संकटावर, वाईट प्रवृत्तीवर मात करण्यासाठी सीमोल्लंघन करून विजय खेचून आणण्याची प्रेरणा देतो. त्यामुळे आपल्याला दसरा उत्साहात साजरा करतानाच विषाणुच्या समूळ उच्चाटनासाठी आरोग्य दक्षतेचे गर्दी न करण्याचे, शारिरीक अंतर राखण्याचे, मास्क वापरण्याचे, वारंवार हात धुण्याच्या सूचनेचे पालन करावे लागेल. अशा प्रय़त्नातूनच आपण कोरोनारुपी रावणाचा नाश करू.’

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यातील जनतेला विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अज्ञानावरील ज्ञानाच्या, अन्यायावरील न्यायाच्या, असत्यावर सत्याच्या, दुष्प्रवृत्तींवर सत्प्रवृत्तीच्या विजयाचा हा उत्सव सर्वांनी आनंदाने, उत्साहाने, सोशल डिस्टन्सिंग व कोरोनाप्रतिबंधन नियमांचे पालन करुन साजरा करुया, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. (हेही वाचा: जाणून घ्या बंगालमध्ये दशमीच्या दिवशी खेळल्या जाणाऱ्या Sindur Khela व Dhunuchi Naach चे महत्व)

विजयादशमीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, दसरा हा आनंदाचा, उत्साहाचा सण आहे. ‘दसरा सण मोठा… नाही आनंदाला तोटा…’ असे आपल्याकडे म्हटले जाते. त्यासाठी जुने वाद-विवाद, भांडण-तंटे विसरुन प्रेमाचे, स्नेहाचे, चांगल्या विचारांचे आदानप्रदान करण्याचा हा सण आहे. आज दसऱ्याच्या निमित्ताने वाईट विचारांना तिलांजली देऊया.’