अहमदनगर: देवेंद्र फडणवीस यांच्या महाजानदेश यात्रेत तरुणीचा हंगामा, मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर केली शाईफेक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Photo Credits: PTI)

भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या तिस-या टप्प्याला आज नगरच्या अकोलेमधून सुरुवात झाली. यासाठी जाहीर सभेसाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या ताफ्यावर एका तरुणीने शाई भिरकावली. सरकारचं महापोर्टल बंद करावं आणि महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्या अशा मागण्या करत तरुणीने हे कृत्य केले. मटाने दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकर्ती असल्याचे सांगण्यात येतय.

काही दिवसांतच विधानसभेचे बिगुल वाजणार असून सर्व पक्षांमधून जोरदार तयारी सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर अकोलेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यासाठी मुख्यमंत्र्यांचा ताफा येताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकर्ती त्या ताफ्याजवळ घोषणाबाजी करत आली आणि तिने त्या ताफ्यावर शाई भिरकावली. मात्र तो शाईचा फुगा ताफ्यापर्यंत न पोहोचता रस्त्यावरच फुटल्याने रस्त्यावर सर्वत्र शाई पसरली. या तरुणीवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. हेही वाचा-

येत्या आठवडाभरात उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि जेपी नड्डा यांच्यात युती जागावाटपाची चर्चा होणार

दरम्यान, कुकडीचे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी श्रीगोंद्याचे राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे त्यांना पोलिसांनी आधीच ताब्यात घेतले होते.