प्रातिनिधिक प्रतिमा (photo credit : Healthline)

दोन दिवसांपूर्वी (बुधवारी) पनवेलच्या पाताळगंगा परिसरात रात्री साडेनऊच्या सुमार मोठी वायुगळती झाली. हिंदुस्थान ऑर्गेनिक केमिकल कंपनी (Hindustan Organic Chemicals) तून ही वायुगळती झाली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली होती. या वायुगळतीचा परिणाम फक्त परिसरातील लोकांवरच झाला नाही तर, वन्यजीवांवरही झाला आहे. या वायुगळतीचे प्रमाण फार जास्त होते, यामुळेच वातावरणात अनेक विषारी वायू मिसळले गेले. या वायुगळतीमुळे कंपनीतले दोन वॉचमनही बेशुद्ध झाले होते. तर 28 वानरांसह 48 माकडे मृत्युमुखी पडली आहेत.  तसेच 100 हून अधिक पक्षी गतप्राण झाले आहेत. मात्र याचा कोणालाही थांगपत्ता न लागू देता कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या वन्यप्राण्यांची विल्हेवाट लावली आहे. अधिकारी विल्हेवाट लावत असताना अनेक लोकांनी पहिले आहे.

हिंदुस्थान ऑर्गेनिक केमिकल(एचओसी) कंपनी ही इस्रोसाठी इंधन निर्मितीचे काम करते. 13 डिसेंबरला म्हणजेच बुधवारी रात्री 9.45 च्या सुमारास कंपनीच्या इंधनाच्या टाकीतून वायुगळती सुरू झाली. या गोष्टीचा परिणाम परिसरातील अनेक जणांवर झाला आहे. पशु-पक्ष्यांना पुरण्यासाठी जेसीबीने खड्डा खणण्यात आला. त्यानंतर एकाच खड्ड्यात मोठमोठ्या वानरांसह माकड आणि कबुतरांना गाडण्यात आले. या घटनेनंतर कंपनी बंद करण्यात आली असून, सध्या तरी कंपनीचा एक प्लांट सुरू आहे. मात्र या घटनेने प्राणी मित्रांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.