‘घराला घरपण मिळवून देणारी माणसं’, अशी जाहिरात करून कोट्यवधी रुपये किंमतीची घरे बांधणार्या डीएसकेंना (D. S. Kulkarni) स्वत:च्याच घरात भाड्याने राहण्याची वेळ आली आहे. ग्राहकांची फसवणूक करणार्या डीएसकेंचा पुण्यातील बंगला ईडीने जप्त केला होता. परंतु, डीएसकेंनी गुरुवारी न्यायालयात याच बंगल्यात राहण्यासाठी सुमारे 11 लाख रूपये भाडे देण्याची तयारी दाखविली आहे. (अलिबाग येथील नीरव मोदी याच्या बंगल्यात सापडला दुर्मिळ वस्तूंचा खजिना)
ईडीने दीपक सखाराम कुलकर्णी उर्फ डीएसके यांना हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली होती. तसेच डीएसके यांचा पुण्यातील ‘डीएसके व्हिला’ हा 11 कोटी रुपये किंमतीचा बंगलाही ईडीने जप्त केला होता. या बंगल्यात डीएसके यांना राहायचं असेल तर बाजार मुल्याप्रमाणे त्यांना 11 लाख रुपये प्रतिमहिना भाडे द्यावे लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. न्यायालयाने डीएसकेंना यासंदर्भात 10 दिवसांत निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. ही मुदत 25 सप्टेंबर रोजी संपल्याने ईडीने डीएसकेंचा बंगला ताब्यात घेतला.
हेही वाचा - आर्थिक फसवणूक प्रकरणी डीएसके समूहाची 904 कोटींची मालमत्ता ‘ईडी’कडून जप्त
डीएसकेंनी या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत अपील दाखल करत 3 लाख रुपये दरमहा भाडे देण्याची तयारी दाखवली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ईडीने डीएसके यांच्याकडे 11 लाख रूपये भाड्याची मागणी केली. अखेर डीएसकेंनी 2 महिन्यांसाठी 11 लाख रूपये भाडे देण्याची तयारी दर्शवली आहे.