मुंबई मध्ये CSMI Airport वर महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई; पेस्टच्या स्वरूपातील 8 किलो सोने जप्त

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांच्या पथकाने, 17 जानेवारी 2023 रोजी दुबईहून मुंबईला येणारा प्रवाशांचा गट,  भारतात पेस्टच्या स्वरुपात सोन्याची तस्करी करत असल्याच्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMI Airport) पाळत ठेवली होती. या संशयित प्रवाशांची ओळख पटली आणि पथकाने त्यांना विमानतळावर अडवले. प्रवाशांची कसून तपासणी केल्यावर त्यांच्याकडून पेस्टच्या स्वरूपातील 8.230 किलो सोने हस्तगत करण्यात आले. या सोन्याची किंमत अंदाजे 4.54 कोटी रुपये इतकी आहे.

जप्त करण्यात आलेले बहुतेक सोने प्रवाशांच्या अंतर्वस्त्रांमध्ये लपवून ठेवण्यात आले होते, त्यामुळे ते शोधणे अत्यंत कठीण होते. देशात विविध स्वरुपात सोन्याची तस्करी करणाऱ्यांना   आळा घालण्याच्या आव्हानात्मक कामगिरीसाठी डीआरआयचे अधिकारी अवलंबत असलेली अनोखी कार्यपद्धती यामधून सूचित होते.

या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली. देशात अवैध मार्गाने सोन्याची तस्करी करणाऱ्या व्यक्तींची संपूर्ण साखळी उलगडून काढण्याच्या दृष्टीने, या प्रकरणाचा पुढील तपास प्रगतीपथावर आहे.