नायर हॉस्पिटल (Nair Hospital) मधील शिकाऊ डॉक्टर पायल तडवी (Payal Tadvi) हिच्या आत्महत्येनंतर जातीयवादाच्या मुद्द्याने आणखीनच जोर धरला आहे. अनुसूचित जातीच्या पायलचा मानसिक छळ करत तिला आत्महत्येला प्रवृत्त करण्याच्या आरोपावरून काही दिवसांपूर्वी रुग्णालयातील तीन डॉक्टरांना कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान सामाजिक संघटनांच्या मागण्या मान्य करत तडवी कुटुंबाला सरकार कडून दहा लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य विद्यापीठ आणि वैद्यकीय शिक्षण संशोधन संचानलनालयाने तयार केलेल्या समितीचा तपास सुरु असून सोमवारी या प्रकरणी तडवी कुटुंबीयांची चौकशी पार पडली होती.
जळगावच्या छोट्या गावातून संघर्षमय परिस्थितीला तोंड देत डॉक्टर झालेल्या पायलच्या आत्महत्यामुळे कुटुंबाचे व समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कुटुंबाला आर्थिक मदत, कायदेशीर सहाय्य मिळायला हवे, अशी मागणी अनेक सामाजिक संघटनांकडून करण्यात येत होती. ही मागणी लक्षात घेऊन सरकारकडून दहा लाख रुपयांची मदत देण्यात आल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्र टाइम्सच्या सूत्रांना सांगितले आहे. यासोबतच या प्रकरणाचा अभ्यास करणाऱ्या समितीमध्ये आदिवासी व अनुसूचित जातींच्या प्रश्नच भान असणाऱ्या अभ्यासकांना नेमण्यात यावे असे देखील संघटनांचे म्हणणे आहे.पायलच्या आत्महत्यामुळे रॅगिंग किंवा जातीय छळाच्या तक्ररींना गांभीर्याने घेत यावर समाधान आणण्यासाठी योग्य ती यंत्रणा तयार करण्याची मागणी देखील लावून धरली जातेय.
तडवी कुटुंबीयांनी काही दिवसांपूर्वी नायर हॉस्पिटलच्या बाहेर आंदोलन करत या प्रकरणाचा कायदेशीर तपास व्हावा अशी मागणी केली होती.सोमवारी पार पडलेल्या चौकशीत पायलने याआधी कुटुंबाकडे तिला होणाऱ्या त्रासाची वाच्यता केली होती का? त्यावर कुटुंबांने काय भूमिका घेतली होती? या संदर्भात पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती का? याबाबत कसून चौकशी करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी हॉस्पिटलमधील सीसीटीव्हीचे फुटेज तपासून पाहिल्यास काही पुरावे हाती लागू शकतात असे देखील तडवी कुटुंबाने सांगितले आहे.Dr. Payal Tadvi Suicide Case: नायर हॉस्पिटलची मान्यता रद्द करा - तडवी कुटुंबीयांची मागणी
या प्रकरणी रीतसर तपास करून तडवी कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. पोलिसांच्या तपासात पायलची आत्महत्या ही रॅगिंगमुळेच झाल्याचे सिद्ध झाल्यास आरोपींचा वैद्यकीय परवाना कायमचा रद्द करण्यात येणार आहे.