Deepak Tilak | X@AjitPawar

लोकमान्य टिळकांचे नातू आणि 'केसरी' चे संपादक डॉ. दीपक टिळक (Dr.Deepak Tilak) यांचे आज (16 जुलै) निधन झाले आहे. वृद्धापकाळाने त्यांनी राहत्या घरीच अखेरचा श्वास घेतला. टिळकवाड्यात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनाला ठेवण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी 12 च्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. दीपक टिळक हे काही काळ टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांनी 'केसरी'चे विश्वस्त संपादकपद देखील भूषवले आहे. जपानी भाषेच्या प्रसारासाठी डॉ. दीपक टिळक यांनी केलेल्या कामाची जपान सरकारनेही दखल घेतली होती.

टिळक कुटुंबाचा वारसा दीपक टिळक यांनी समर्थपणे जपला. इंदुताई टिळक आणि जयंतराव टिळक यांचे दीपक टिळक हे पुत्र होते. आता दीपक टिळक याचे सुपुत्र रोहित टिळक हे काँग्रेसचे नेते आहेत. 2009, 2014 च्या विधानसभा निवडणूकीत ते उतरले होते मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

अजित पवार यांचा शोकसंदेश

काही दिवसांपूर्वी एका खाजगी हॉस्पिटल मध्ये डॉ. दीपक टिळक यांना दाखल करण्यात आले होते मात्र वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी घरीच अखेरचा श्वास घेतला. दीपक टिळक यांच्या निधनाने पुण्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी नातवंडे असा परिवार आहे.