
उद्या 14 एप्रिल 2025 रोजी संपूर्ण देशभरात डॉ. बाबसाहेब आंबेडकर जयंती साजरी होणार आहे. हा दिवस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि सामाजिक समतेचे प्रणेते डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांच्या जन्मदिवसाचा आहे. महाराष्ट्रात या दिवसाला विशेष महत्त्व आहे, आणि यंदा तो बँक सुट्टी म्हणून पाळला जाईल. उद्या महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी बँकांचे कामकाज बंद राहील. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आपल्या 2025 च्या सुट्टीच्या यादीत 14 एप्रिलला बाबसाहेब आंबेडकर जयंतीसाठी महाराष्ट्रात बँक सुट्टी जाहीर केली आहे.
या दिवशी सर्व सरकारी आणि खासगी बँकांच्या शाखा बंद राहतील. याचा अर्थ, चेक प्रक्रिया, रोख व्यवहार किंवा इतर शाखा-संबंधित कामे होणार नाहीत. मात्र, नागरिकांना डिजिटल सेवांचा लाभ घेता येईल. एटीएम, मोबाइल बँकिंग, यूपीआय आणि इंटरनेट बँकिंग यासारख्या सुविधा नेहमीप्रमाणे कार्यरत राहतील. बँकिंग कामे असणाऱ्यांनी 15 एप्रिलला आपली कामे नियोजित करावीत. ही सुट्टी महाराष्ट्रासह देशातील 20 हून अधिक राज्यांमध्ये जाहीर करण्यात आली आहे, जिथे बाबासाहेबांचा प्रभाव विशेष आहे.
उद्या, 14 एप्रिल रोजी त्रिपुरा, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, गोवा, झारखंड, सिक्कीम, तामिळनाडू, गुजरात, चंदीगड, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान, तेलंगणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि आसाम या राज्यांमध्ये बँका बंद असतील. आंबेडकर जयंतीव्यतिरिक्त 14 एप्रिल रोजी विशु, बिजु, बुईसू, महाविशुभ संक्रांती, तामिळ नववर्ष दिन, बोहाग बिहू आणि चेराओबा या सणांचाही समावेश आहे. यामुळेही अनेक ठिकाणी बँकांना सुट्ट्या असतील. (हेही वाचा: Dr. B R Ambedkar Jayanti 2025 Tour Circuit: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 14 व 15 एप्रिल 2025 रोजी मुंबई, नाशिक आणि नागपूर येथे मोफत टूर सर्कीटचे आयोजन)
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला, पण त्यांनी आपल्या आयुष्याचा मोठा भाग महाराष्ट्रात व्यतीत केला. त्यांनी दलित, आदिवासी, कामगार आणि महिलांच्या हक्कांसाठी अथक लढा दिला. भारतीय राज्यघटना लिहिण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे, ज्यामुळे भारताला समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यावर आधारित लोकशाही मिळाली. अंबेडकर जयंती हा दिवस केवळ त्यांच्या जन्मदिनाचा उत्सव नाही, तर त्यांच्या समतेच्या विचारांना आणि सामाजिक सुधारणांना सलाम करण्याचा प्रसंग आहे. महाराष्ट्रात हा दिवस ‘ज्ञानदिन’ आणि ‘समानता दिन’ म्हणूनही ओळखला जातो.