महाराष्ट्रात दिवसेंदिवस स्थिती गंभीर बनत चालली असून देशाच्या तुलनेत ही स्थिती चिंताजनक असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले. ते फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संदर्भात सध्याची स्थिती यावर नजर टाकत नागरिकांना खबरदारीच्या अनेक नियमांची उजळणी करून दिली. त्यासोबत पालघरमध्ये घडलेल्या घटनेचे राजकारण करु नका असे सांगत या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.
तसेच केंद्राने बनविलेल्या नियमावलीचे पालन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असून केंद्र सरकारचे नियम तंतोत पाळणे गरजेचे असल्याचे शरद पवारांनी सांगितले. अमेरिकेसारखी महाशक्ती कोरोनामुळे संकटात आली असल्याने अन्य देशांशी आपल्या देशाशी तुलना करणे योग्य नाही असा सल्ला ही त्यांनी दिला. Coronavirus: महाराष्ट्रात आज सकाळी 10 वाजेपर्यंत नव्या 472 जणांना कोरोना बाधा; राज्यातील COVID-19 रुग्णसंख्या एकूण 4676
लॉकडाऊनमुळं देश, राज्याच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्यामुळे अर्थव्यवस्था सांभाळण्याचं आव्हान आपल्या सर्वांसमोर आहे असा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. यासोबतच पालघरमधील घडलेली घटना आणि कोरोनाचा काहीही संबंध नसून कायदा सुव्यवस्था बिघडल्याचं चित्र बनवलं जातयं असे त्यांनी यावेळी सांगितले. पालघर प्रकरणाच्या सखोल चौकशीबाबत मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले असून विनाकारण या घटनेचे राजकारण करु नका असेही शरद पवार म्हणाले.
महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांची संख्या असलेल्या मुंबईत 155 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून येथील रुग्णांची संख्या 3090 जाऊन पोहोचली आहे. तर पुण्यात कोविड-19 चे 65 नवे रुग्ण समोर आले असून या जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 734 झाली आहे.