Death | Representational Image | (Photo Credits: Twitter)

मुंबईतील (Mumbai) 5 रुग्णालयाने पाठ फिरवल्यानंतर डोंगरी येथील 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. खालिद अली शेख (Khalid Ali Shaikh) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. खालिद यांना मधुमेहाचा आजार असून शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी खालीद यांचा मुलगा शहाबाज याने मुंबई महानगरपालिकेचा हेल्पालाईन नंबरवर फोन केला. मात्र, त्याला रुग्णालयातून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. एवढेच नव्हेतर, खालीद यांची ऑक्सिजन पातळी खालवल्याने मुंबईतील 5 रुग्णालयाने त्यांना दाखल करण्यास नकार दिला. अखेर राज्य सरकारच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केल्यानंतर खालिद यांचा अवघ्या 4 तासात मृत्यू झाला, अशी माहिती टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे.

खालिद हे मूळचे केरळचे आहेत. तसेच खालिद हे गेल्या अनेक वर्षांपासून मधुमेहाच्या आजाराने ग्रस्त होते. मात्र, खालिद यांना गेल्या 4 दिवसांपासून ताप आणि अशक्तपणा जाणवत होता. शुक्रवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास त्यांची प्रृकती ढासळली. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शाहबाजने  मुंबई महानगरपालिकेच्या हेल्पलाईन नंबरवर फोन केला. मात्र, या हेल्पलाईन नंबरवरून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असा आरोप खालिद यांच्या नातेवाईकांनी केला आहे. सुरुवातीला खालिद यांना माझगावमधील प्रिन्स एली खान रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यावेळी प्रिन्स रुग्णालयातील वैद्यकीय कर्माचाऱ्यांनी खालिद यांची नाडी तपासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिला. तसेच त्यांच्यात करोनाचे लक्षणे दिसून आल्याचे सांगत त्यांना चर्नी रोड येथील एच एन रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. मात्र, एच एन रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर तिथेही खालिद यांना दाखल करून घेतले नाही आणि त्यांना मारोलच्या समर्पित कोविड रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका दिली. दरम्यान, खालिद यांची ऑक्सिजन पातळी अधिकच खालवत गेल्याने त्यांना चर्नी रोडच्या सैफी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, सैफी रुग्णालयात त्यांना रुग्णालयाच्या आत जाऊ दिले नाही. यामुळे खालिद यांना मसिना रुग्णालयात नेण्याचे ठरवले गेले. तेथेही त्यांना सुरक्षा कॅबिनमधून पुढे जाऊ दिले नाही. शवेटी त्यांनी बॉम्बे रुग्णालयात धाव घेतली. मात्र, रुग्णालयात डॉक्टर नसल्याने त्यांच्यावर उपचार होऊ शकत नाही, असे रुग्णालयाच्या एका प्रवक्त्याने सांगितले. अखेर खालिद यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांना एक बेड उपलब्ध करुन देण्यात आला. परंतु, रुग्णालयात दाखल केल्यानंतर अवघ्या 4 तासांच्या आताच त्यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती शाहबाज यांनी दिली आहे. हे देखील वाचा-अमरावती येथे 13 वर्षीय मुलाला कोरोनाची लागण, आकडा 56 वर पोहचला

जर खालिद यांनी योग्य वेळ उपचार मिळाले असते तर, त्यांचे प्राण वाचले असते, असा आरोप खालिद यांच्या नातेवाईकांनी केला आहे. खालिद यांना सेंट जार्ज रुग्णालयात दाखल करु पर्यंत अडीच तास गेले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे, असा आरोप खालिद यांच्या नातेवाईकांनी केला आहे.