शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे (Shiv Pratishthan) संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, सोमवार 14 एप्रिलच्या रात्री त्यांच्यावर हा हल्ला झाला आहे.सांगली मध्ये भिडे एका धारकरी च्या घरी जेवायला गेले होते. रात्री 11 च्या सुमारास पुन्हा घरी येत असताना कुत्र्याने त्यांच्या पायाचा चावा घेतला. यानंतर संभाजी भिडेंना शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
संभाजी भिडे हे 80 वर्षापेक्षा अधिक वयाचे आहेत. सध्या त्यांच्या प्रकृतीबद्दल कोणतेही अपडेट्स समोर आलेले नाहीत. संभाजी भिडे हे कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणी आणि वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. त्यांच्यावर सामाजिक तणाव निर्माण करणे आणि तरुणांना भडकवणे यासारखे आरोप अनेकदा होतात.
संभाजी भिडे त्यांच्या भूमिकांमुळे अनेकदा चर्चेमध्ये आले आहेत. काही दिवसांपूर्वीच रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याबद्दल सुरू असलेल्या चर्चेत त्यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या विधानाचा विरोध करत वाघ्या कुत्र्याने चितेमध्ये उडी घेतली होती त्यामुळे त्याचे स्मारक असायला हवे अशी भूमिका मांडली होती.
View this post on Instagram
संभाजी भिडे यांनी 1980 च्या दशकात 'शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान' या संस्थेची स्थापना केली आहे. त्यांचे पुणे, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, मुंबई आणि सातारा मध्ये हजारो समर्थक आहेत. या भागात त्यांच्या कामामुळे राजकीय मंडळींसोबतही त्यांचे संबंध आहेत पण ते कधीही राजकीय पक्षात दिसले नाहीत.