एसटी महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. नुकतेच एसटी महामंडळाने त्यांचे कर्मचारी त्याचसोबत अधिकाऱ्यांना दिवाळी भेट देण्याचे ठरवले आहे. कर्मचाऱ्यांना 2500 रुपये तर अधिकाऱ्यांना 5000 रुपये दिवाळी भेट (बोनस) मिळणार आहे. याशिवाय एसटी अधिकाऱ्यांना 10 टक्के इतकी अंतरीम वेतन वाढ मिळणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली.
याचबरोबर अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला. ही दिवाळी भेट अधिकारी–कर्मचाऱयांना तातडीने देण्यात यावी अशा सूचनाही रावते यांनी संबंधितांना दिल्या आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांचे पगार नेहमी 7 तारखेला होत होते, मात्र ते 1 तारखेला करण्यात यावेत अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर आणि निवासी सचिव नारायण उतेकर यांनी केली होती. ही मागणीदेखील महामंडळाकडून मान्य करण्यात आली आहे.
एसटी महामंडळाकडून नुकतीच कर्मचाऱयांसाठी वेतनवाढ देण्यात आली आहे. याच धर्तीवर अधिकाऱ्यांसाठीही वेतनवाढ महामंडळाकडून देण्यात येणार आहे. यासंदर्भातील गोष्टींचा अभ्यास करून ही वेतनवाढ जाहीर करण्यात येईल. त्यासाठी मंत्रालयातील निवृत्त अधिकाऱयांची दोन सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याबाबत या समितीस सूचित केले असून. त्यानंतर अधिकाऱयांना अंतिम वेतनवाढ दिली जाईल. तत्पूर्वी या समितीचा अहवाल येईपर्यंत अधिकाऱयांच्या वेतनात त्यांच्या एकूण वेतनाच्या 10 टक्के इतकी अंतरिम वाढ करण्यात येत असल्याचे मंत्री रावते यांनी जाहीर केले.
एसटी अधिकारी आणि कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्यामध्येही वाढ करण्यात आली आहे. राज्य शासनाप्रमाणे एसटी अधिकाऱयांच्या महागाई भत्त्यात 6 टक्के इतकी वाढ जुन्या वेतनानुसार करण्यात आली आहे. तर एसटी कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्यामध्ये केंद्र शासनाप्रमाणे 2 टक्के इतकी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.