Nhava Sheva: नावा शेवा बंदरातून एक हजार कोटी रुपये किमतीचे 191 किलो ड्रग्ज जप्त
Drugs Seized At Nhava Sheva Port | (Photo Credits: ANI)

नावा शेवा बंदरात (Nhava Sheva Port) आज कस्टम (Customs) अधिकाऱ्यांना अंमली पदार्थांचा मोठा साठा आढळून आला. तब्बल 191 किलो वजनाचे आणि सुमारे 1000 कोटी रुपये किमतीचे हे ड्रग्ज (Drugs) अफगानिस्तानमधून भारतात आणण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. नवी मुंबई (Navi Mumbai) परीसरात येणाऱ्या या ठिकाणाहून कस्टम अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. कस्टम अधिकाऱ्यांच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, एका विशिष्ठ पाईपच्या आत लपवून हे अंमगली पदार्थ अफगानिस्तानमधून भारतात आणले जात होते.

या प्रकरणात दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या मागे मोठे आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस तपास करत आहेत. (हेही वाचा, Mumbai: परदेशातून आलेल्या महिलेने पोटात लपवून आणले 5 कोटींचे कोकेन असलेल्या 80 कॅप्सूल्स, मुंबई विमानतळावर झाली अटक)

देश-विदेशातून होणारी अंमली पदार्थांची तस्करी हा विषय नवा राहिला नाही. विदेशातून छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची तस्करी केली जाते. पोलीस अथवा कस्टम अधिकारी यांच्या निदर्शनास हा प्रकार येऊ नये यासाठी आरोपींकडून वेगवेगळ्या क्लृप्त्या केल्या जातात. तरीही कस्टम अधिकारी आणि पोलीस गुन्हेगारांपर्यंत पोहोचतात आणि हे रॅकेट उद्ध्वस्त करतात. आतापर्यंत कस्टम आणि पोलिसांनी अनेक रॅकेट्सचा पर्दाफाश केला आहे. तरीही नवनवी रॅकेट्स पुन्हा कार्यन्वित होत असल्याचेही अभ्यासक सांगतात.