Dilip Walse Patil Tested COVID-19 Positive: कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण, ट्विटद्वारा दिली माहिती
Dilip Walse Patil (Photo Credits: Facebook)

कोरोना व्हायरसला (Coronavirus) राज्यातून पळवून लावण्यासाठी जनतेसाठी झटत असलेल्या राजकीय नेत्यांना मात्र कोरोनाने आपल्या विळख्यात अडकविण्यास सुरुवात केली आहे. मागील 2-3 दिवसांत महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी ऐकायला मिळाली. त्यात आता कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांची देखील कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. दिलीप वळसे पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. आपल्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसून खबरदारी म्हणून आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहोत अशी माहिती त्यांनी दिली आहे.

'नुकतीच माझी करोना चाचणी करण्यात आली असून, त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून कसलाही त्रास नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी दक्षता म्हणून कोरोनाची चाचणी करून घ्यावी' अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. Ramdas Athawale Tested COVID-19 Positive: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण

तसेच 'आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी बरा होईन आणि पुन्हा महाराष्ट्राच्या सेवेत रुजू होईन' असंही ते म्हणाले आहेत. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस नेते सुनील तटकरे, RPI नेते रामदास आठवले यांच्यासह अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

महाराष्ट्रात काल (28 ऑक्टोबर) 6,738 कोरोना बाधितांची भर पडली असून 91 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या 16,60,766 वर पोहचली आहे. त्यापैकी 14,86,926 जणांनी प्रकृती सुधारली असून 1,29,746 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 43,554 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.