वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर (Puja Khedkar) चे वडील दिलीप खेडकर (Dilip Khedkar) आता आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये (Maharashtra Vidhan Sabha Election) आपलं नशीब आजमवणार आहेत. मीडीया रिपोर्ट्सनुसार दिलीप खेडकर हे अहमदनगर मधील शेवगाव पाथर्डी (Shevgaon Assembly Constituency) मधून आपलं नशीब आजमवणार आहेत. प्रशिक्षणार्थी असलेल्या पूजा खेडकरने बेकायदेशीरपणे मागण्या केल्या होत्या. यावरून पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी या विरूद्ध तक्रार केली आणि पुढे पूजा खेडकर निलंबित झाली.
सकाळ च्या वृत्तानुसार, दिलीप खेडकर यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा मानस व्यक्त केला आहे. लोकसभेत प्रस्थापितांचा त्यांच्यामुळे पराभव झाला. परिणामी खेडकर कुटुंबाला त्रास दिला जात आहे. पण अशा परिस्थितीतही आपण विधानसभा लढवणार असे ते म्हणाले आहेत.
कोण आहेत दिलीप खेडकर ?
दिलीप खेडकर हे माजी सरकारी कर्मचारी आणि प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील आहेत. दिलीप यांना महाराष्ट्र सरकारने दोनदा निलंबित केले होते. लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपावरून खेडकर यांना दोन्ही वेळा निलंबित करण्यात आले होते. आयएएस अधिकारी होण्यासाठी अपंगत्वाचे प्रमाणपत्र खोटे केल्याचा आरोप असलेली त्यांची मुलगी पूजा खेडकर यांच्याभोवती सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हे आरोप समोर आले आहेत.
कोल्हापूर प्रादेशिक अधिकारी असताना वीज आणि पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी पैशांची मागणी केल्याच्या आरोपावरून खेडकर यांना 2018 मध्ये पहिल्यांदा निलंबित करण्यात आले होते. कोल्हापूर Saw Mill and Timber Merchant ने खेडकर यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक शाखेकडे (एसीबी) तक्रार दाखल केली असल्याचे इंडिया टुडेचे वृत्त आहे.
दिलीप खेडकर यांनी 2024 ची लोकसभा निवडणूकही वंचित बहुजन आघाडी (VBA) च्या तिकिटावर लढवली होती. आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात खेडकर यांनी सुमारे 40 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे.