Devendra Fadnavis | (PTI)

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण (Pooja Chavan Suicide Case) हे दिवसेंदिवस चिघळत चालले असून वनमंत्री संजय राठोड मंत्रिपदाचा राजीनामा देणार की नाही हे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच संजय राठोडांवर (Sanjay Rathod) कारवाई का केली जात नाही असा प्रश्न देखील विरोधी पक्षाकडून विचारला जात आहे. "सत्ता पक्षाच्या नेत्यांना वेगळा न्याय आहे का? सत्ता पक्षाच्या नेत्यांना लैंगिक स्वैराचार करण्याची मुभा नवीन कायद्याने दिली का? कोणती नवी शक्ती या नेत्यांना तुम्ही दिली," असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारला विचारला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

"सगळे पुरावे असताना कोणतीही कारवाई संजय राठोडयांच्यावर होत नाही, याबद्दल फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. राठोड यांना वरिष्ठांचा आशीर्वाद आहे, त्यामुळे हे सर्व शक्य होत आहे," असं फडणवीस यांनी म्हटलं.हेदेखील वाचा- वनमंत्री संजय राठोड प्रकरणावर शर्मिला ठाकरे यांनी दिली 'ही' प्रतिक्रिया

पुरावे असताना पोलीस कारवाई करत नाही, मंत्री राजीनामा देत नाही, सरकारही काही कारवाई करत नाही. त्यामुळे मी या प्रकरणात संजय राठोड यांना दोष देणार नाही. त्यांना त्यांच्या वरिष्ठांचा आशीर्वाद आहे. म्हणून हे सर्व शक्य आहे. त्यामुळे राज्यात या सरकारचा चेहरा उघड झाला आहे, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून पुणे पोलिसांवरही फडणवीस यांनी टीका केली. सगळे पुरावे असताना साधा एफआयआर दाखल होऊ नये हे आश्चर्य आहे. महाराष्ट्र पोलिसांचं नाव संपूर्ण भारतात घेतलं जातं, त्यांची झालेली लाचार अवस्था आम्ही याआधी कधी पाहिलेली नाही. पुणे पोलिसांच्या ज्या पोलीस निरीक्षकांकडे या प्रकरणाचा तपास आहे त्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.