धुळे: भाजपवासी होऊन वाल्याचा वाल्मिकी झालेल्या गुंडाला अभय; इतर ३२ गुंडांवर मात्र हद्दपारीचा बडगा
भाजप (File Photo)

धुळे महानगर पालिका आणि नजिकच्या काळात होऊ घातलेल्या लोकसभा, विधानसभेसह सर्वच निवडणुका सुरळीत पार पडाव्यात. कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन होणाऱ्या घटना घडू नयेत म्हणून पोलिसांनी कायद्याची अंमलबजावणी चोख करण्यास सुरुवात केली आहे. या अंमलबजावणीचाच भाग म्हणून धुळे शहरात येणाऱ्या विविध पोलीस स्टेशन हद्दीतील सुमारे ३२ गुन्हेगारांना धुळे शहरातून किमान दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. दरम्यान, हद्दपारीची ही कारवाई करताना सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या एका गुंडावर मात्र पोलीसांनी मेहेबानी दाखवल्यामुळे इतर गुंडांवर पोलिसांनी केलेली कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे.

धुळे पोलिसांच्या हद्दपारीच्या करावाईतून वगळलेल्या गुंडाचे नाव देवा सोनार असे आहे. एका पोलीस अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा देवा सोनार याच्यावर आहे. त्यामुळे इतर ३२ अट्टल गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली. मग, देवा सोनारवर का नाही, असा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे. दरम्यान, भाजपमध्ये आल्यावर वाल्याचा वाल्मिकी होतो, असे विधान भाजपच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने गेल्या काही काळात केले होते. त्यानुसार देवा सोनार यांचाही वाल्मिकी झाला का? अशी उपहासात्मक चर्चा धुळ्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, तसेच, रोहयो, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत देवा सोनार याने भाजपमध्ये प्रवेश केला होता. या पक्षप्रवेशामुळेच पोलिसांनी देवा सोनार यांना अभय दिल्याचे बोलले जात आहे.

देवा सोनार आणि चंद्रकांत सोनार या पितापुत्रांसह सुमारे २० ते २५ जणांच्या टोळक्याने पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्यावर जुने धुळे परिसरात जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात पोलीस अधिकारी धनंजय पाटील गंभीर जखमी झाले होते. ही घटना २०१३ मध्ये होळीच्या दिवशी घडली होती. या प्रकरणात देवा सोनार याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच, हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.