Voting | Representational Image | (Photo credits: PTI)

Ahmednagar, Municipal Corporation Election 2018: राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी (Ahmednagar, Municipal Corporation) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 65 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे.  महापालिका निवडणुकीसाठी बरेच उमेदवार रिंगणात उतरले असले तरी, शिवसेना,भाजप आणि राष्ट्रवादी या प्रमुख पक्षातच प्रामुख्याने सामना पाहायला मिळाला.. दरम्यान, उद्या (सोमवार,10 डिसेंबर) मतमोजणी पार पडणार आहे. रविवारी सकाळी 7.5 वाजता सुरु झालेले मतदाना सायंकाळी 5 वाजता संपले.

सकाळी मतदाना सुरु झाले तेव्हा, पहिल्या चार तासात सुमारे 15 टक्के मतदान पार पडल्याचे पाहायला मिळाले. महापालिकेच्या १७ प्रभागातील ६८ जागांसाठी ३३९ उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, राजकीय विश्लेषणासाठी विद्यमान स्थितीवर नजर टाकायची तर, राष्ट्रावादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस आघाडी करून मैदानात आहेत. तर, राज्यात आणि केंद्रात सत्तेत एकत्र असलेले शिवसेना, भाजप स्वतंत्र लढत आहेत. महापालिका निवडणूकीसाठी एकूण असलेल्या 68 जागांसाठी भाजप सर्वच्या सर्व 68 जागा लढवत आहे. तर, शिवसेना 61, राष्ट्रवादी 46, काँग्रेस 21 जागा लढवत आहे. भाजपच्या एकूण 68 उमेदवारांपैकी 35 महिला उमेदवार आहेत. याशिवाय १०६ अपक्षांचे राजकीय पक्षांच्या उमेदवारांसमोर आव्हान असणार आहे. (हेही वाचा, अहमदनगर महानगरपालिका निवडणूक 2018: 9 डिसेंबरला मतदान, 10 डिसेंबरला मतमोजणी)

अहमदनगर महापालिकेच्या निवडणूक इतिहासावर नजर टाकता महापालिकेच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच निवडणूकीत शिवसेनेचा महापौर निवडूण आला होता. मात्र, त्यानंतर पुढे कोणत्याच राजकीय पक्षाला अहमदनगरवर सलग 5 वर्षे सत्ता राखता आली नाही. त्यामुळे उद्याच्या मतमोजणी निकालातून काय समोर येते याबाबत उत्सुकता आहे.