Ahmednagar Municipal Corporation Election 2018: एकूण 17 प्रभागातील 68 जागांसाठी 351 उमेदवार अहमदनगर महानगरपालिका निवडणूक (Ahmednagar Municipal Corporation Election)मैदानात नशीब आजमावत आहेत. सुमारे 2 लाख 56 हजार मतदार या उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला करतील. तसेच, अहमदनगर महापालिकेच्या सत्तेची चावी कोणाच्या हातात द्यायची हेही ठरवलतील. मतदारांना आपला मतदानाचा राष्ट्रीय हक्क बजावण्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी निवडणूक आयोगानेही जय्यत तयारी केली आहे. त्यासाठी एकूण 13 इमारतींमध्ये 337 मतदान केंद्रं उपलब्द करुन दिली आहेत. एकूण मतदान केंद्रांपैकी 137 मतदान केंद्र ही संवेदनशील तर, 41 मतदान केंद्र ही अतिसंवेदनशील आहेत.
दरम्यान, पोलीस प्रशासनानेही मतदानादरम्यान कोणताही अनुचीत प्रकार घडू नये. तसेच, आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे. 1 पोलीस अधीक्षक, 2 अप्पर पोलीस अधीक्षक, 6 पोलीस उपअधीक्षक यांच्यासह 2 हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा शहरात तैनात केला आहे. तर, निवडणूक प्रक्रिया पार पाडताना मतदारांना अडचण येऊ नये यासाठी 2 हजार निवडणूक कर्मचारी तैनात आहेत. (हेही वाचा, धुळ्यात भाजप विरुद्ध स्वाभिमानी भाजप संघर्ष टोकाला)
दरम्यान, राजकीय विश्लेषणासाठी विद्यमान स्थितीवर नजर टाकायची तर, राष्ट्रावादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस आघाडी करून मैदानात आहेत. तर, राज्यात आणि केंद्रात सत्तेत एकत्र असलेले शिवसेना, भाजप स्वतंत्र लढत आहेत. महापालिका निवडणूकीसाठी एकूण असलेल्या 68 जागांसाठी भाजप सर्वच्या सर्व 68 जागा लढवत आहे. तर, शिवसेना 61, राष्ट्रवादी 46, काँग्रेस 21 जागा लढवत आहे. भाजपच्या एकूण 68 उमेदवारांपैकी 35 महिला उमेदवार आहेत.
अहमदनगर महापालिकेच्या निवडणूक इतिहासावर नजर टाकता महापालिकेच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच निवडणूकीत शिवसेनेचा महापौर निवडूण आला होता. मात्र, त्यानंतर पुढे कोणत्याच राजकीय पक्षाला अहमदनगरवर सलग 5 वर्षे सत्ता राखता आली नाही.