राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा धक्का, दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले भगव्याच्या वाटेवर; उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार शिवसेना प्रवेश
Dhanraj Mahale former NCP MLA | (Photo Credits: Facebook)

Maharashtra Vidhan Sabha Election 2019: राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षामागे लागलेले शुक्लकाष्ट काही संपन्याची चिन्हे दिसेनात. विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक एक मोहरा सत्ताधाऱ्यांच्या गळाला लागताना दिसत आहे. सचिन अहिर, शिवेंद्रराजे भोसले (Shivendrasinh Raje Bhosale),संदीप नाईक (Sandeep Naik), वैभव पिचड (Vaibhav Pichad) यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिंडोरी (Dindori) विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार धनराज महाले (Dhanaraj Mahale) शिवसेना (Shiv Sene) पक्षाच्या वाटेवर आहेत. पूर्वी शिवसेनेतच असलेल्या महाले यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून घरवापसी होणार आहे. महाले यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत धनराज महाले यांचा शिवसेना पक्ष प्रवेश पार पडणार असल्याचे समजते.

शिवसेना पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीने धनराज महाले यांना दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवले होते. मात्र, भाजप उमेदवार डॉ. भारती पवार यांनी त्यांचा पराभव केला. विशेष असे की, डॉ. भारती पवार याही मूळच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्याच. परंतू, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्या भारतीय जनता पक्षात प्रवेशकर्त्या झाल्या. भाजपने त्यांना दिंडोरी लोकसभा मतदारसंघात उतरवले. त्यांनी महालेय यांचा पराभव करत विजय मिळवला.

धनराज महाले यांचा परिचय पाहायचा तर ते समाजवादी नेते आणि माजी खासदार दिवंगत हरीभाऊ महाले यांचे चिरंजीव आहेत. शिवसेनेच्या तिकीटावर ते 2009 मध्ये दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. परंतू, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारवा लागला. दरम्यान, लोकसभा निवडणूक 2019 मध्ये त्यांनी मैदानात उतरविण्याचे ठरवले. मात्र, शिवसेना-भाजप यूतीच्या जागावाटपात त्यांचा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला. त्यामुळे त्यांनी हातावरचे शिवबंधन काढत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेतले. पण, त्यांना पराभव स्वीकारावा लागला. (हेही वाचा, सचिन अहिर यांचा शिवसेना प्रवेश; उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बांधल शिवबंधन; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का)

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार गळती लागली आहे. ही गळती कशी थांबवायची याचा पक्षच्या गोटात विचार सुरु असतानाच महाले यांच्या पक्षांतराची बातमी आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आगामी निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. पक्षाने विधानसभा निवडणूक उमेदवारीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेणेही सुरु केले आहे. आता या मुलाखती भाजप-शिवसेनेचा विजयवारू रोखण्यासाठी कामी येणार काय, याबाबत उत्सुकता आहे.