Dhananjay Munde, Karuna Munde | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

घरगुती हिंसाचार प्रकरणात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मोठा धक्का बसला आहे. करुणा मुंडे-शर्मा (Karuna Munde) यांनी केलेले कौटुंबीक हिंसाचाराचे आरोप वांद्रे कोर्टाने मान्य केले आहेत. ज्यामुळे राज्य सरकारमधील बहुचर्चीत मंत्री मुंडे घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी ठरले आहेत. करुणा शर्मा याच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत. त्यामुळे धनंजय यांनी पत्नी करुणा यांना प्रतिमहिना 2 लाख रुपये पोटगी म्हणून देण्यात यावेत असे आदेशही कोर्टाने दिले आहेत. धनंजय मुंडे या निर्णयाविरुद्ध वरच्या कोर्टात दाद मागणार का याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, मस्साजोगचे सरपंच धनंजय देशमुख हत्या प्रकरणी चर्चेत असलेल्या वाल्मिक कराड याच्यशी असलेल्या संबंधांवरुन आगोदरच वादात असलेल्या मुंडे यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.

धनंजय मुंडे यांचा पाय खोलात?

करुणा शर्मा-मुंडे या आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहोत, असा दावा सातत्याने करत आल्या आहेत. त्यांनी या संदर्भात वारंवार जाहीर पत्रकार परिषदाही घेतल्या आहेत. शिवाय त्यांनी बीड येथून निवडणुकही लडवली आहे. त्या सातत्याने धनंजय मुंडे यांच्या विरोधात वक्तव्य करत असल्याचे पाठिमागील प्रदीर्घ काळापासून पाहायला मिळत होते. दरम्यान, आता कोर्टाचाच निर्णय आल्याने मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. (हेही वाचा,Karuna Munde: करुणा मुंडे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल; प्रकरणाला नवे वळण मिळाल्याची चर्चा)

अंजली दमानिया यांच्याकडून करुणा शर्मा यांचे अभिनंदन

दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडिया मंच एक्स (जुने ट्विटर) वरुन एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, 'करुणा मुंडे या फैमिली कोर्टात 4 फेब्रुवारी रोजी केस जिंकल्या त्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचे अभिनंदन. मी वैयक्तिक विषयावर बोलत नाही आणि ही वैयक्तिक टीका नाही ह्याची नोंद घ्यावी. (हेही वाचा, ‘Let Her Earn’: घटस्फोट देणाऱ्या पतीकडून 6 लाख रुपये पोटगी मागणाऱ्या महिलेला न्यायाधीशांनी सुनावले खडे बोल, पाहा व्हिडीओ)

'वैयक्तीक टीका नाही याची नोंद घ्यावी'

याच एक्स पोस्टमध्ये दमानिया यांनी पुढे म्हटले आहे की, करुणा, ह्या धनजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा आणि कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये, असे निर्देश आणि 1,25,000 रुपयाचा मासिक खर्च देण्यात यावा असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.'

दरम्यान, या निर्णयाबाबत स्वत: करुणा मुंडे किंवा धनंजय मुंडे यांनी अद्यापपर्यंत तरी प्रसारमाध्यमांसमोर किंवा इतर माध्यमातून कोणत्याही प्रकारचे जाहीर भाष्य केले नाही. ते दोघेही केव्हा आणि काय भाष्य करतात याबाबत उत्सुकता आहे.