Karuna Sharma | | (Photo Credits: Facebook)

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde), करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्यातील न्यायालयीन वाद आणि त्यावर त्यांचा मुलगा सिशिव मुंडे याने इन्स्टाग्रामवर दिलेली प्रतिक्रिया या सर्वांवरुन राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. त्यातच वांद्रे कोर्टाने धनंजय मुंडे यांनी करुणा यांना प्रतिमहिना निश्चित रक्कम पोटगी म्हणून द्यावी असे आदेश दिले आहेत. यावरुन प्रसारमाध्यमांत आगोदरच चर्चा आहे. त्यातच आता करुणा मुंडे (Pankaja Munde) या देखील पुन्हा आक्रमक झाल्या असून, आपण अद्याप तोंड उघडले नाही. पण तोंड उघडले तर धनंजय मुंडेच काय पंकजा मुंडे यांचेही मंत्रीपद जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले आहे.

'तुम्ही रस्त्यावर सोडू शकत नाही'

करुणा शर्मा (मुंडे) यांनी म्हटले आहे की, पाठिमागील 27 वर्षांपासून मी धनंजय मुंडे यांची पत्नी आहे. मला जर बोलायचेच असेल तर मी कोठेही बोलेन. आताही कॅबिनेटमध्ये येऊन बोलेन. तुम्ही मला काहीही झाले तरी रस्त्यावर सोडू शकत नाही. मी तुमची पत्नी आहे. असे असून देखील धनंजय मुंडे माझ्याच विरोधात कटकारस्थान रचतो आहे. मला तर इतकेच सांगायचे आहे की, मी वाईट महिला आहे, हे मी मान्य करते. माझ्या मुलांनाही माझ्याविरोधात भडकवले जात आहे. पण मी जर तोंड उघडले तर पंकजा मुंडे यांचेदेखील मंत्रिपद जाईल. माझ्या नवऱ्याला त्रास दिला असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानािमुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. (हेही वाचा, Karuna Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांना द्यावी लागणार प्रतिमहिना 2 लाख रुपयांची पोटगी; कोर्टाचा निर्णय करुणा यांच्या बाजूने)

दरम्यान, वांद्रे कोर्टाने दिलेल्या निर्णयाबद्दल करुणा शर्मा यांनी आभार मानले आहेत. कोर्टाने दिलेल्या निर्णयाबद्दल मी आभारी आहे. पण, आमची मागणी दोन लाखांची नाही. मला 15 लाख मिळावे अशी कोर्टाकडे मागणी केली होती. पण, तरीदेखील मी कोर्टाची आभारी आहे. आमच्या मागणीसाठी आम्ही वरच्या कोर्टात पुन्हा दाद मागणार आहोत. धनंजय मुंडे हे माझ्याविरोधात मुद्दाम कारस्थान रचत आहेत. फुट टाका आणि राज्य करा हे त्यांचे सुरुवातीपासूनचे धोरण आहे. स्वत: तोंड उघडून काहीच बोलत नाहीत आणि माझ्या विरुद्ध माझ्याच मुलाला उभं करतात. हा काय प्रकार आहे. पाठिमागचे कित्येक दिवस माझा मुलगा फस्ट्रेशनमध्ये होता. त्याचे काही बरे वाईट झाले तर हा माणूस स्वत:ला माफ करु शकणार आहे का? अशा शब्दात करुणा यांनी धनंजय मुंडे यांच्याबद्दल वक्तव्य केले आहे.