अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल अमोल कोल्हे यांनी केलेल्या वक्तव्यावर पहा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस (Watch Video)
Amol Kolhe & Devendra Fadnavis (Photo Credits: Facebook)

अजित पवार (Ajit Pawar) यांना मुख्यमंत्री पदी बसलेलं पाहायचं आहे," असं जाहीर वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (NCP MP Dr. Amol Kolhe) यांनी पिंपरी चिंचवडी (Pimpri Chinchwad) मधील भोसरी (Bhosari) येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात केलं. यावरुन अनेक चर्चा रंगत असताना यावर आता विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. (शरद पवार यांना पंतप्रधान तर अजित पवार मुख्यमंत्री झालेलं पाहायचं आहे- खासदार अमोल कोल्हे)

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "स्वप्न पाहायला काही हरकत नाही. स्वप्न कोणीही पाहू शकतं. पण या तीन पायांच्या सरकारमध्ये समन्वय नाही आणि आता तो समन्वयाचा अभाव आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्यांदा समन्वयाच्या अभावामुळे त्यांच्यामध्ये अडचणी निर्माण व्हायच्या. पण आता त्यांच्या समन्वयाच्या अभावामुळे जनतेमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. यात जनता पिसली जात आहे." पुढे ते म्हणाले की, "प्रत्येक पक्षाचे नेते वेगवेगळे बोलत असतात. हा एक प्रकारचा तमाशा आहे. त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही जी काही स्वप्न रंगवत आहात ती जनतेकरता रंगवा." मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस ट्विट:

काय म्हणाले होते अमोल कोल्हे?

"शरद पवार यांना पंतप्रधान तर अजित पवार यांना मुख्यमंत्री पदी बसलेलं पाहायचं आहे," अशी इच्छा अमोल कोल्हे यांनी जाहीरपणे व्यक्त केली. तसंच यासाठी कार्यकर्त्यांची फळी, नेत्यांची मोट बांधून झुंजार अन् लढाऊ वृत्ती आपण साहेबांना दाखवून दिली पाहिजे, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं.

दरम्यान, आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने त्याकडे अधिक लक्ष दिले जात आहे.