काँग्रेसमधून निलंबित असलेल्या आशिष देशमुख यांनी (Ashish Deshmukh) आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर फडणवीस आणि बावनकुळे काहीही बोलले नसले तरी आशिष देशमुख यांनी ही सदिच्छा भेट होती, फडणवीस हे विदर्भाचा विकास घडवणारे एकमेव नेते आहेत आणि पक्ष विरहित संस्कृतीच्या नात्याने ते माझ्याकडे आले होते अशी प्रतिक्रिया दिली. नागपूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या दोन माजी मंत्र्यांना शह देण्यासाठी ही भेट असल्याचे सुत्रांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस आज नागपूर जिल्ह्यातील हिंगणा आणि उमरेड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र त्यापूर्वी ते देशमुखांच्या घरी पोहोचले. यावेळी फडणवीस यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील आहेत. आता देवेंद्र फडणवीस आणि आशिष देशमुख यांच्या भेटीमुळे देशमुख भाजपच्या वाटेवर आहेत का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
नागपूर जिल्ह्यातील सावनेर मतदारसंघातून 1995 पूर्वी आशिष देशमुख यांचे वडील रणजित देशमुख निवडणूक लढवत होते. तेव्हापासून काँग्रेसचा एक मोठा गट रणजीत देशमुख यांना मानणारा असून त्यामुळे आशिष देशमुख यांना सावनेरमधून भाजपची उमेदवारी दिल्यास सुनील केदार यांच्यासमोर दमदार उमेदवार देता येईल अशी भाजपची खेळी आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आशिष देशमुख सामनेरमधून भाजपचे उमेदवार राहिले होते आणि अवघ्या 3 हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता.