राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना रेमडेसिवीर (Remdesivir), ऑक्सिजनचा (Oxygen) साठा अपुरा पडत आहे. यावरुन राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात सातत्याने वाद होत आहे. यावरुन राज्यातील भाजपचे नेते वारंवार राज्य सरकारवर टीका करत आहेत. आता पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी रेमडेसिवीरच्या काळाबाजार प्रकरणी राज्य सरकारवर (Maharashtra Government) आरोप केले आहेत. सरकारचे पुरेसे नियोजन नसल्यानेच रेमडेसिवीरचा काळाबाजार होत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पालघर (Palghar) जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर टीव्ही9 मराठी सोबत संवाद साधताना त्यांनी असे म्हटले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "रेमडेसिवीर बनवणाऱ्या कंपन्यांकडून इंजेक्शनचे वितरण सरकार आणि खाजगी कंपन्यांमध्ये होत आहे. परंतु, खाजगी कंपन्यांमध्ये होणाऱ्या वितरणामध्ये व्यवस्थापनाचा अभाव असल्याने रेमडेसिवीरची कमतरता जाणवून येत आहे. महाराष्ट्रात येणारे रेमडेसिवीर पॉवरफुल मंत्र्यांच्या विभागात जात आहेत. त्यामुळे पालघर सारख्या छोट्या विभागांमध्ये रेमडेसिवीर पोहचण्यास विलंब लागत आहे किंवा काही वेळेस उपलब्ध देखील होत नाही."
"महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकाने सर्वाधिक रेमडेसिवीर, ऑक्सिजन, मशिनरी दिली आहे. त्याचबरोबर केंद्र सरकार सातत्याने या गोष्टींचा पुरवठा करत आहे. मी दुव्याचं काम करण्यासही तयार आहे. पण मला दुव्याचं काम करा म्हणायचं आणि महाविकास आघाडीने राजकारण करायचं ते पटतं नाही, म्हणून निदान यांनी राजकारण करणं बंद केलं पाहिजे ही माझी अपेक्षा आहे," असेही ते पुढे म्हणाले,
पहा व्हिडिओ:
सरकारचे पुरेसे नियोजन नसल्यानेच रेमडेसिवीरचा काळाबाजार!
महाविकास आघाडीने निदान या काळात तरी राजकारण करू नये...
पालघर येथे ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद...#SayNoToDirtyPolitics #Maharashtra@TV9Marathi pic.twitter.com/SvEgnSbsmD
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 1, 2021
पुढे पालघर जिल्ह्याबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "पालघर, वाडा या दुर्गम भागात आरोग्य व्यवस्था उपलब्ध करणे गरजेचे आहे. येथील पॉझिटीव्ही रेट 25 टक्क्यांच्या वर गेला असून तो आटोक्यात आणणे अत्यंत गरजेचे आहे. आरटीपीआर टेस्टचे प्रमाण चार पटीने वाढवण्याची गरज आहे. या ठिकाणी मेडिकल कॉलेज आणि सिव्हील हॉस्पिटल्स नसल्यामुळे सब्स-सेंटर्स मध्ये ऑक्सिजन बेडच्या सुविधा वाढवण्याची गरज आहे. कोविड सेंटर्स उभे करण्यासाठी भोईसर येथील इंडस्ट्रीजने देखील मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे."