Dengue | Representational image (Photo Credits: pxhere)

यंदा जानेवारी ते 7 मे या कालावधीत डेंग्यूचे 1755 रुग्ण आढळले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रुग्णसंख्या दीडपट झाली आहे. सर्वाधिक रुग्ण पालघर जिल्ह्यात आढळले  असून त्याखालोखाल कोल्हापूर, अकोला, नांदेड आणि सोलापूर या जिल्ह्यांत रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. राज्यात यंदा जानेवारी ते 7 मे या काळात डेंग्यूचे 1 लाख 27 हजार 140 संशयित रुग्ण आढळले. गेल्या वर्षी याच कालावधीत ही संख्या 81 हजार 731 होती. यंदा निदान झालेल्या डेंग्यू रुग्णांची संख्या 1755 आहे. गेल्या वर्षी ही संख्या 1237 होती.  (हेही वाचा - Mumbai: 'पालिकेचे कर्मचारी निवडणूक कामातून कार्यमुक्त, पावसाळी कामांवर परिणाम होणार नाही'; वृत्तपत्रांमधील बातम्यांवर प्रशासनाचे स्पष्टीकरण)

राज्यभरात यंदा 1 लाख 88 हजार 834 संशयित रुग्णांची डेंग्यूची चाचणी करण्यात आली आहे. यंदा राज्यभरात आतापर्यंत डेंग्यूमुळे एकही मृत्यू झालेला नाही. गेल्या वर्षी मात्र या कालावधीत एका रुग्णाचा मृत्यू झाला होता, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.  राज्यात सर्वाधिक 174 डेंग्यूचे रुग्ण पालघर जिल्ह्यात आढळले आहेत. त्याखालोखाल कोल्हापूर जिल्हा 117, अकोला जिल्हा 71, नांदेड जिल्हा 58, सोलापूर जिल्हा 51 अशी रुग्णसंख्या आहे.

जून या महिन्यात हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्या, झिका, चंडीपुरा आणि हत्तीरोग या आजारांविषयी समाजात जनजागृती केली जात आहे. याचबरोबर किटकजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार आरोग्य विभागांकडून उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे.