Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोकणातील दापोलीच्या साई रिसॉर्ट (Dapoli Sai Resort) प्रकरणी सदानंद कदम (Sadanand Kadam) यांच्यानंतर आता तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे (Jairam Deshpande) यांना अटक केली आहे. ईडीच्या (ED) ताब्यातून दापोली पोलिसांनी (Dapoli Police) ही अटक केली आहे. कोर्टाने आता त्यांना 3 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. सध्या देशपांडे यांचा मुक्काम दापोलीच्या सबजेल मध्ये आहे. तर उद्योजक सदानंद कदम हे सध्या ईडीच्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांच्यावर नियम धाब्यावर बसवत साई रिसॉर्टला बिनशर्त परवानगी दिल्याचा ठपका आहे. दापोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रूपा दिघे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून जयराम देशपांडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी आमदार अनिल परब , सुरेश तुपे व अनंत कोळी यांच्या विरोधात दापोली पोलीस ठाण्यात 8 नोव्हेंबर 2022 रोजी तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीनुसार तिघांवर गुन्हा दाखल झाल्यावर त्यांनी खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून 19 नोव्हेंबर 22 रोजी अटकपूर्व जामीन घेतला होता. पण देशपांडे यांना दापोली पोलिसांनी ईडीच्या कोठडीतून या गुन्ह्यात वर्ग करुन घेतले आहे.

दापोली पोलिसांनी बुरोंडी मंडळाचे तत्कालीन मंडळ अधिकारी सुधीर शांताराम पारदुले यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना देखील 15 मार्चला अटक केली होती. पण सध्या ते जामीनावर बाहेर आले आहेत. याच प्रकरणी आता साई रिसॉर्टला बिनशेती परवाना दिल्याचं सांगत दापोलीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांना दापोली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सध्या जयराम देशपांडे यांना शासनाने निलंबित केले आहे. त्यामुळे त्यांची चौकशी सुरु आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्याकडे आहे.