Dahi Handi Festival 2022: मुंबई, ठाण्यात 138 गोविंदा जखमी; 88 जणांना डिस्चार्ज, बाकिच्यांवर अद्यापही उपचार सुरु
Dahi Handi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई, ठाणे आणि उर्वरीत महाराष्ट्रातही काल (19 ऑगस्ट) दहीहंडी (Dahi Handi 2022) उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला. मुंबई (Mumbai),पुणे (Pune), नाशिक (Nashik), नागपूरसह (Nagpur) देशभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होताना पाहायला मिळाले. दरम्यान, दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना झालेल्या अपघातांमुळे सुमारे 138 गोविंदा जखमी (Injured Govinda) झाले आहेत. हा आकडा केवळ मुंबई आणि ठाणे येथील आहे. प्राप्त माहितीनुसार, मुंबईत 111 तर ठाण्यात 37 गोविंदा जखमी झाले. यापैकी 88 गोविंदांना वैद्यकीय उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे तर बाकिच्यांवर अद्यापही उपचार सुरु आहेत. दहीहंडीच्या उत्सवात काल राजकीय नेतेही मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले. दहीहंडी हा एक प्रकारचा राजकीय कार्यक्रमच झाल्याचे पाहायला मिळत होते.

कोरोना व्हायरस महामारीमुळे पाठिमागील दोन वर्षे राज्यातील सर्वच सण आणि उत्सवांवर मर्यादा होत्या. त्यामुळे सण साजरे करण्यावर बऱ्याच मर्यादा आल्या होत्या. यंदा कोरोना निर्बंध हटविण्यात आलयामुळे सर्वच सण साजरे करण्यास मोकळीक मिळाली. परिणामी दहीहंडी उत्सव दणक्यात साजरा करण्यात आला. मुंबई, ठाणे येथे साजरा झालेला दहीहंडी उत्सव प्रामुख्याने राजकीय होता. मुंबई आणि ठाणे परिसरात आयोजित करण्यात आलेल्या अपवाद वगळता सर्वच दहीहंडी या राजकीय पक्ष अथवा त्या पक्षांच्या नेत्यांकडून प्रायोजित होत्या. त्यामुळे या उत्सवाला कितीही सणाचे कोंदण लावले तरीही या दहीहंडी राजकीय होत्या हे लपून राहिले नाही. (हेही वाचा, CM On Uddhav Thackeray: दहीहंडीच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र, म्हणाले - आनंद दिघेंची इच्छा आता पूर्ण झाली)

दरम्यान, मुंबई आणि ठाणे शहरांमध्ये दहीहंडीचा उत्साह मोठ्या प्रमाणावर दिसून आला. गोविंदा पथकांनी मोठ्या उत्साहात दहीहंडी फोडली. यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात मुंबईतून 111 तर ठाणे परिसरातूनही मोठ्या प्रमाणावर गोविंदा जखमी झाले. यातील मुंबईतील 88 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर 23 जणांवर अद्यापही उपचार सुरु आहेत. ठाण्यातीलही जखमी गोविंदांवर उपचार सुरु आहेत. कोणत्याही गोविंदाला गंभीर जखम अथवा दुखापत झाली नाही. अद्यापपर्यंत तरी हाती आलेल्या माहितीनुसार कोणत्याही गोविंदाला आपले प्राण गमवावे लागले नाहीत.

जखमी गोविंदांवर वैद्यकीय उपचार मोफत करण्यात यावेत अशा सूचना राज्य सरकारने राज्यातील सर्व शासकीय दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेचे दवाखाने यांना केल्या होत्या. तसेच राज्य सरकारने याबाबत काढलेला निर्णय हा स्थायी स्वरुपाचा असल्याने आता दरवर्षी हा नर्णय लागू राहील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.