Dadar Flower Market (Photo Credits: Wikimedia Commons)

मुंबईत (Mumbai) कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अजूनही काही ठिकाणी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात नाही. ज्यामुळे भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेने दादर मधील फुलमार्केट (Dadar Flower Market) आणि भाजी मार्केट दुस-या ठिकाणी हलविण्याचे निर्देश दिले आहेत. या मार्केटमधील वाढती गर्दी लक्षात घेता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत काल (17 मार्च) 2377 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 8 जणांना मृत्यू झाला आहे. तर 876 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

दरम्यान मुंबईत कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता दादर येथील फुलमार्केट आणि भाजी मार्केट हलवून हे दोन्ही बाजार बीकेसीतील एमएमआरडीए व सायन येथील सोमय्या मैदानावर हलवण्यात येणार आहेत.हेदेखील वाचा- BMC च्या स्पेशल ड्राईव्ह मध्ये Breach Candy Hospital परिसरात मास्क न घातलेल्या 245 जणांना दंड; Gaumdevi police station मध्ये गुन्हा दाखल

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची बुधवारी मुंबई पोलिस सहआयुक्तांसह बैठक झाली. या बैठकीत दादर येथील भाजी व फुल बाजारात वसई, विरार, पालघर, ठाणे, कल्याण, डोंबिवली, कर्जत येथून पहाटे तीननंतर व्यापारी आणि विक्रेते मोठ्या संख्येने येत असतात अशी चर्चा झाली. या वाढत्या गर्दीबाबत चिंता व्यक्त करत महापालिकेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

सुरक्षित अंतर आणि मास्क नियमावलीचे बाजारांमध्ये उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. बीकेसी व सोमय्या मैदानात दोन्हीकडे भाजी व फुल विक्रेते बसतील, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. बाजार हलवण्याबाबत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली असून दादर पोलिस ठाणे आज, गुरुवारपासून अंमलबजावणी करतील, अशी माहिती महापौरांनी दिली.

महाराष्ट्रातील बाजारपेठेत, भाजी मंडईतील गर्दी रोखता येत नाही. मात्र तेथे कोरोना नियमांचे पालनही होत नाही. अशा परिस्थितीत भविष्यात आपल्याला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. या सर्वाचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला आहे.