निसर्ग (Nisarga), तौक्ते (Tauktae) आणि यास (Yaas) या चक्रीवादळानंतर आता गुलाब (Gulab) चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळाने पश्चिम किनारपट्टीचे नुकसान केले. तर यास चक्रीवादळाने पूर्व किनारपट्टीला झोडपून काढले. त्यानंतर आता गुलाब चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) दाखल झाले आहे. त्यामुळे पूर्व किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि ओडिशा राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावरही (Maharashtra) होणार असून राज्याला पुढील 3-4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी ट्विटद्वारे दिलेल्या माहितीनुसार, गुलाब चक्रीवादळ बंगालाच्या उपसागरात दाखल झाल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीला चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. 26 सप्टेंबर म्हणजेच उद्या हे वादळ उत्तर आंध्र प्रदेश, दक्षिण ओडिसा किनारपट्टी, कलिंगपट्नम व गोपालपूर मध्ये धडकण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील 3-4 दिवस महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, असा इशारा देण्यात आला आहे.
K S Hosalikar Tweet:
गुलाब चक्रिवादळ बंगालच्या उपसागरात -IMD
उ आंध्र प्रदेश व द ओरीसा किनारपट्टीला चक्रिवादळाचा इशारा
26 Sept संध्याकाळी उ.आंध्र प्रदेश व द.ओरीसा किनारपट्टी,कलिंगपट्नम व गोपालपूर मध्ये धडकण्याची शक्यता
महाराष्ट्रसाठी IMD ने पुढच्या 3,4 दिवसासाठी काही ठिकाणी मुसळधार पावसाचे इशारे दिलेत pic.twitter.com/Qs3p7uOCVU
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 25, 2021
दरम्यान, गुलाब चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात दाखल झाले असून पुढील 12 तासांत या वादळाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मात्र सोमवारनंतर वादळाचा धोका कमी होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.