Thane: ठाणे जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका व्यक्तीला शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यावर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर फसवणूक करणाऱ्यांनी (Cyber Criminal) 47 लाख रुपयांचा गंडा घातला. पीडित व्यक्तीच्या तक्रारीच्या आधारे, गुरुवारी माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्यांतर्गत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात असल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. ही फसवणूक गेल्या वर्षी डिसेंबर ते या वर्षी फेब्रुवारी दरम्यान झाली होती. आता पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली लाखो रुपयांचा गंडा -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व्हॉट्सअॅपवरील एका ग्रुपशी जोडलेले होते आणि शेअर ट्रेडिंग अॅपद्वारे काम करत होते. त्यांनी पीडित व्यक्तीशी संपर्क साधला आणि आकर्षक परताव्याचे आश्वासन देऊन 'शेअर्स'मध्ये पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवले. पीडित व्यक्तीने गेल्या तीन महिन्यांत विविध बँक खात्यांमध्ये 47,01,652 रुपये टाकले. पैसे देऊनही जेव्हा त्याला पैसे मिळाले नाहीत तेव्हा त्याला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. (हेही वाचा - Cyber Crime News Pune: 'थाळी एकावर एक फ्री', सायबर गुन्हेगाराकडून महिलेची दोन लाखांची फसवणूक)
त्यानंतर पीडित व्यक्तीने पोलिसांशी संपर्क साधला. याआधी उत्तर प्रदेशातील नोएडा येथेही अशीच एक घटना घडली होती. खरं तर, उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) गाझियाबादमधून दोघांना शेअर बाजारातील ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. (वाचा - Bihar: कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंगचा विद्यार्थी झाला सायबर गुन्हेगार, पोलिसांनी कारवाई करून केली अटक)
उत्तर प्रदेशात समोर आल्या फसवणुकीच्या घटना -
एसटीएफचे पोलिस अधीक्षक (नोएडा युनिट) राजकुमार मिश्रा यांनी सांगितले की, एका माहितीच्या आधारे, पथकाने गाझियाबादच्या वसुंधरा येथील सेक्टर 5 मधील मोहन मीकिन्स सोसायटीमधील एका फ्लॅटवर छापा टाकला आणि दोघांना अटक केली. विनोद कुमार धामा आणि रवींद्र उर्फ नवाब अशी त्यांची ओळख पटली आहे, ते बागपत जिल्ह्यातील रहिवासी आहेत. पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, हे लोक टोळी तयार करून फसवणूक करायचे आणि विनोद हा त्या टोळीचा म्होरक्या आहे. या लोकांनी दरमहा 10 ते 15 टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे.