पिंपरी: भजी खाल्ल्याचे पैसे मागितल्याने हॉटेलमालकावर केले कोयत्याने वार
फोटो सौजन्य - PTI

आजकाल लोकांची मती इतकी भ्रष्ट झाली आहे की, कधी कोणाला कसला राग येईल काही सांगता येत नाही. पिंपरीमध्ये एक छोटे नाश्त्याचे हॉटेल चालवणा-याने आपल्या ग्राहकाकडे भजी खाल्ल्याचे पैसे मागितल्याचा राग मनात ठेवून चौघांनी या पीडितावर कोयत्याने वार केले. हा धक्कादायक प्रकार बुधवारी रात्री घडला. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशुतोष काटे, आतू शेख, महेश जगताप व सलीम पापा शेख असे आरोपींची नावे आहेत. यातील महेश जगताप या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. राहुल प्रसाद झेंडे असे पीडिताचे नाव आहे.

हेही वाचा- Pune: हॉटेलमधील बिलाच्या वादावरुन तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून केली निर्घृण ह्त्या

राहुल झेंडे यांचे नाश्त्याचे सेंटर आहे. तेथे आरोपींनी भजी खाल्ली. त्याचे पैसे राहुलने त्यांच्याकडे मागितल्याचा आरोपींना राग आला. त्यामुळे त्यांनी राहुल झेंडे याच्या घरी जाऊन त्यांच्यावर लाकडी दांडक्याने मारहाण केली तसेच लोखंडी कोयत्याने वार केले. त्यांना थांबविण्यासाठी गेलेल्या मौलाना शेख यांनाही लाकडी दांडक्याने वार करून लोखंडी कोयत्याने वार करून जखमी केले. याप्रकरणी सांगवी पोलीस अधिक तपास करत असून जखमींवर उपचार सुरु आहेत.