500 रुपयांच्या नोटांचे पडतायत तुकडे, सांगली जिल्ह्यातील विटा येथील प्रकार
Currency note of Rs.500 | (file photo)

घडी घालताच पाचशे रुपयांच्या नोटांचे तुकडे पडत असल्याची घटना सांगली (Sangli) जिल्ह्यातील विटा (Vita) शहरात नागरिकांना पाहायला मिळाली. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते अनिल राठोड (Anil Rathod) यांनी हा प्रकार स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), शाखा विटा कार्यालयातील प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. 500 रुपयांच्या एकूण 14 म्हणजे सात हजार रुपये रकमेच्या या नोटा आहेत. राठोड यांनी एसबीआयच्या विटा शाखेतील कार्यालयात शाखा व्यवस्थापक असलेल्या महेश दळवी यांनाही या नोटा दाखवल्या. तसेच, नोटा बदलून देण्याती मागणी केली.

प्राप्त माहितीनुसार, या नोटा अनिल राठोड यांच्या नसून मोलमजूरी करणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या आहेत. राठोड यांच्या घराशेजारी राहणारी ही महिला रोजंदारीने कामाला जाते. काही दिवसांपूर्वी या महिलेला कामाचे पैसै मिळाले होते. हे पैसे तिने पाकिटात ठेवले होते. दरम्यान, या महिलेने 15 मे रोजी पाकिटातील पाचशे रुपयांच्या सात नोटा बाहेर काढल्या आणि ती मिरच्या खरेदी करण्यासाठी बाजारात गेली. दरम्यान, पाकिटातील पैसै तिने घडी घालून रुमालात ठेवले होते. बाजारात रुमाल सोडून पाहिले तर, नोटांचे तुकडे पडले होते.

नोटांचे तुकडे पडल्याचे पाहून महिला घाबरुन गेली. तिने रुमालातील इतर नोटा कशा आहेत पाहण्यासाठी त्यांनाही घडी घातली असता त्यांचेही तुकडे पडले. त्यामुळे ही महिला अधिकच घाबरली. दरम्यान, या महिलेने अनिल राठोड यांना या प्रकाराची माहिती दिली. त्यांनीही सत्यता तपासली असता त्यांनाही तोच अनुभव आला. त्यानंतर राठोड यांनी एसबीआय विटा शाखा कार्यालयाशी संपर्क साधला. तसेच, शाखा प्रमुख महेश दळवी यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. (हेही वाचा, लवकरच चलनात येणार डिजिटल नोटा; ही असेल नोटांची खासियत)

दरम्यान, बँकेने तुकडे पडत असलेल्या एकूण नोटांपैकी केवळ एकच नोट बदलून दिली आहे. तर, उर्वरीत नोटा बदलून देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता या तुकडे पडणाऱ्या नोटांचे करायचे तरी काय? असा सवाल संबंधीत महिलेला पडला आहे.