सातारा जिल्ह्यात महामार्ग वगळता रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी, तर बुलढाण्यातील 5 नगरपालिका क्षेत्रे कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर
Lockdown | File Image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस (Coronavirus) वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्यात कोरोनाचे नियम अधिक कडक केले जात आहे. तसेच ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे त्यातील अनेक जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यात आता सातारा जिल्ह्यात रात्री 11 ते पहाटे 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात (Satara) महामार्ग वगळता सर्व ठिकाणी संचारबंदी असेल असे जिल्हाधिका-यांनी सांगितले आहे. तसेच दुसरीकडे बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील 5 नगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने ते 5 क्षेत्र कंटेन्मेंट झोन म्हणू घोषित करण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यात महामार्ग वगळता रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली. दरम्यान रात्रीची संचारबंदी असली तरी जिल्ह्यातील शाळा सुरु राहणार आहेत. शाळांमध्ये तपासणी पथके पाहणी करणार आहेत.हेदेखील वाचा- I Am Responsible: 'मी जबाबदार' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून नवीन मोहिमेची घोषणा

दरम्यान बुलढाणा, खामगाव, मलकापूर, चिखली आणि देऊळगाव राजा ही नगरपालिका क्षेत्र कंटेन्मेंट झोन म्हणून जिल्हाधिकारी यांनी घोषित केली आहेत. यातील निर्बंध अतिशय कडक असणार आहेत. त्यात रात्रीची संचारबंदी, खाजगी वाहनांना फिरण्यास बंदी इत्यादी नियम असणार आहेत.

पुढील 8 दिवसात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली तर, लॉकडाऊनचा निर्णय घेण्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही नागरिकांना संकेत दिले आहेत. कोरोना काळात नागरिकांनी मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग, वारंवार धुणे गरजेचे आहे. तसेच माझे कुटुंब, माझी जबाबदारीनंतर उद्धव ठाकरे यांनी 'मी जबाबदार' या नवीन मोहिमेची घोषणा केली आहे. यातच लॉकडाऊनबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महत्वाची घोषणा केली आहे. कृपा करा, कठोर निर्णय घेण्याची वेळ राज्य सरकारवर येऊ देऊ नका! हेच मला महाराष्ट्रातील जनतेला सांगायचे आहे, असा निर्वाणीचा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.