महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज दिल्लीच्या हाती आहे . शिवसेनेच्या (Shivsena) 16 आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत आणि राजकीय आरक्षणावर सुनावणी बाबत आज सर्वोच्च न्यायालय (SC) आपला निकाल देणार आहे. त्यामुळे आजचा दिवस महाराष्ट्रासाठी महत्वाचा आहे. मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आमदारांपाठोपाठ खासदारांचा गट शिवसेनेतुन वेगळा गट स्थापन झाला आहे. या निर्णयानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' (Samana) मधुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्रावर सध्या अस्मानी संकट आहेच, पण सुलतानी संकटाने राज्य जास्त बेजार आहे. पूर्वीचे सुलतान मंदिरे पाडत होते, आजचे सुलतान शिवसेना फोडत आहेत' असं म्हणत शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
'ज्या बारा खासदारांनी आता स्वतंत्र गट स्थापन केला ते शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले व लोकसभेत पोहोचले. हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर आपण वेगळा गट स्थापन करीत आहोत या त्यांच्या बतावणीस अर्थ नाही. प्रत्येकाचे एक स्वतंत्र, व्यक्तिगत व केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावाचे प्रकरण आहे. त्यातूनच हे पलायन घडले. तसेच शिवसेना फोडून बाहेर पडलेल्यांना त्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या पायघडय़ाच घातल्या आहेत. आता म्हणे खासदारांच्या ‘12’च्या गटासही मंत्रिपदाची बक्षिसी दिली जाणार. आता ही बक्षिसी म्हणजे शिवसेनेच्या वाट्यास नेहमीच आलेले अवजड उद्योग खाते असेल की आणखी कोणते असेल, ते कळेलच' असा टोलाही सेनेनं लगावला आहे. (हे देखील वाचा: सर्वोच्च न्यायालयात आज महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा दिवस! शिवसेनेच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत, राजकीय ओबीसी आरक्षणावर सुनावणी)
शिवसेनेचे उरलेले 6 खासदार अडचणीत
दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शेवाळे यांना गटनेतेपदी तर भावना गवळी यांना प्रतोदपदी मान्यता दिल्यामुळे शिवसेनेचे उरलेले 6 खासदार अडचणीत आले आहेत. शिवसेनेच्या या 6 खासदारांना लोकसभेत भावना गवळी यांचा व्हिप मान्य करावा लागेल. या 6 खासदारांनी व्हिप मान्य केला नाही तर त्यांच्यावर कारवाईदेखील होऊ शकते. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्येही यावर भाष्य केलं होतं. शिवसेनेच्या सर्व 18 खासदारांना आमचा व्हिप मान्य करावा लागेल, असं शिंदे म्हणाले होते.