Saamna and Chandrakant Patil (Photo Credits: Twitter and Facebook)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी सामनाच्या संपादक पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर आज सामना मधील अग्रलेखात भाजपाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल चढविण्यात आला आहे. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा ‘भाजपचे दादामियां’ असा उल्लेख करत दादामियां ‘इतिहास पुरुष’ कधीपासून झाले? असा सवाल ‘सामना’तून विचारला आहे. औरंगाबाद शहराचे नाव 'संभाजीनगर' करण्यात यावे अशी मागणी चंद्रकांत पाटील यांच्याकडून करण्यात आली होती. मात्र असे नामांतर हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 25 वर्षांपूर्वीच केले होते असेही या अग्रलेखात म्हटले आहे.

‘दादामियांसारख्या लोकांनी औरंग्याची पिशाचे कितीही उकरुन काढली, तरी महाराष्ट्राची शांतता भंग पावणार नाही, हे दादामियांनी पक्के लक्षात ठेवावे. असे अनेक दादामियां गोधड्या भिजवत होते, तेव्हा शिवसेना हिंदुत्व आणि राष्ट्रकार्यासाठी छातीचा कोट करुन लढत होती. दादामियां हे ध्यानात ठेवा!’ असा थेट इशारा ‘सामना’तून देण्यात आला आहे. ‘सामना’ च्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची नियुक्ती, शिवसेना मुखपत्राच्या बनल्या पहिल्या महिला संपादक

भाजपचे दादामियां ‘इतिहास पुरुष’ कधीपासून झाले? त्यांना इतिहासाचे उत्खनन करण्याची इतकीच आवड असेल, तर पंचवीस वर्षांपूर्वी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ केल्याचे त्यांच्या लक्षात यायला हवे होते, अशा कानपिचक्या अग्रलेखातून लगावण्यात आल्या आहेत.

इतकच नव्हे तर चंद्रकांत दादांची पावलं ही फडणवीसांच्या पावलावर पडत आहेत. जिथे नको तिथे जीभ टाळ्याला लावत आहेत, अशी बोचरी टीकाही भाजप नेत्यांवर करण्यात आली आहे.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’च्या संपादकपदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची निवड करण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी ‘सामना’ दैनिकाचं संपादकपद सोडलं होतं. रश्मी ठाकरे यांच्या निवडीनंतर हे पद ठाकरे कुटुंबाकडेच राहिलं आहे.