
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीच्या तिसऱ्या लाटेबाबत राज्यातील जनतेसाठी दिलासादायक माहिती दिली आहे. डिसेंबर ते जानेवारी या महिन्यांमध्ये कोरोना व्हायरस संसर्ग वाढला होता. मात्र, लसीकरण, उपाययोजना आणि आवश्यक ती घेतलेली काळजी या सर्वांमुळे कोरोना व्हायरस संसर्ग नियंत्रणात आला आहे. त्यामुळे मार्च महिन्यापर्यंत कोरोनाची तिसरी लाट (Covid Third Wave) कमी होईल, असे भाकीत राजेश टोपे (Rajesh Tope On COVID-19 Third Wave) यांनी केले आहे.
राजेश टोपे हे जालना येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या वेळी त्यांना प्रसारमाध्यमांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत विचारले असता माहिती देताना त्यांनी हे भाकीत केल. राज्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढला होता. मात्र, लसीकरण आणि आरोग्य विभागाच्या उपाययोजनामुळं परिस्थिती नियंत्रणात होती. पुढेही ती आणखी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले. (हेही वाचा, Coronavirus: पूर्णपणे लसीकरण झालेल्या रुग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता कमी, शासकीय आकडेवारीच्या आधारावर ICMR चा दावा)
लॉकडाऊन लाऊच नये आणि कमीत कमी निर्बंध लावण्याकडेच शासनाचा कल आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातही त्याबाबत चर्चा झाली. ग्रामीण भागासोबतच मुंबई आणि पुण्यातही कोरोना संसर्गाचे प्रमाण घटले आहे. अर्थात काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे प्रमाण अद्यापही वाढतेच आहे. मात्र, असे असले तरी ते प्रमाणही खाली येईल असे राजेश टोपे म्हणाले.