Mumbai Unlock: मुंबईत येत्या काही दिवसांत निर्बंध शिथील होण्याची शक्यता- पालकमंत्री अस्लम शेख
Unlock | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

राज्यात कोविड-19 ची दुसरी लाट (Covid-19 Second Wave) ओसरत असल्याने निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यात येतील, अशी आशा होती. मात्र निर्बंधात कोणते बदल करण्यात आलेले नसलेल्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कालच्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर स्पष्ट केले. दरम्यान, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी निर्बंध शिथीलकरणाबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. निर्बंध शिथील करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून येत्या काही दिवसांत मुंबईत निर्बंध शिथील होऊ शकतात, असे पालकमंत्री अस्लम शेख (Guardian Minister Aslam Sheikh) यांनी म्हटले आहे.

या अंतर्गत हॉटेल व्यवसाय, व्यापारी, कापड उद्योग यांना सूट देण्याचा विचार सुरु असून सर्व व्यवहार सुरळीत करण्याबाबतही विचारविनिमय केला जात आहे, असे शेख यांनी सांगितले. मात्र निर्बंध शिथीलकरणासाठी जास्तीत जास्त लसीकरण होणे गरजेचे आहे. परंतु, केंद्र सरकारकडून लसपुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्याने लसीकरणाचा वेग मंदावला आहे. परिणामी निर्बंध शिथिलकरणाची अंमलबजावणी देखील लांबणीवर पडली आहे, असेही शेख म्हणाले.

दरम्यान, कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना मुंबई लोकलने प्रवासाची मुभा मिळणार, असे बोलले जात होते. तशी मागणीही अस्लम शेख यांनी केली होती. मात्र त्यावर मंत्रीमंडळ बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. मात्र लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्याचा विचार सुरु असल्याचे शेख यांनी सांगितले आहे.

कोविड-19 तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध कठोर राहण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिलेली माहिती दिलासादायक असली तरी राज्य सरकारकडून नेमके कोणते निर्णय घेतले जाणार, हे पुढील काळात स्पष्ट होईल.