Screening for coronavirus | Representational image | (Photo Credits: PTI)

कोरोना विषाणू (Coronvavirus) संसर्ग नियंत्रणासाठी मुंबईने (Mumbai) अंमलात आणलेले विकेंद्रीकरणाचे प्रारूप देशपातळीवर राबवण्याची गरज आहे, असे मत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केले आहे. या वेळी पुण्याने राबवलेल्या प्ररुपाचेही कौतुक करण्यात आले. मुंबईतल्या 24 विभागांसाठी प्रत्येकी 24  नियंत्रण कक्ष स्थापन केले गेले. रुग्णांच्या चाचणीचे अहवाल संबंधित विभागात पाठवले जातात. प्रत्येक नियंत्रण कक्षात 30 टेलिफोन, त्यासाठी स्वतंत्र ऑपरेटर्स. प्रत्येक विभागात 10 डॉक्टर आणि 10 रुग्णवाहिकांची सोय केली आहे. त्यामुळे रुग्ण वाढ आटोक्यात राहिली.

तसेच, मुंबईतील 800 एसयूव्ही गाड्या तात्पुरत्या रुग्णवाहिकांमध्ये रुपांतरीत केल्या गेल्या आहेत. यामुळे रुग्णांना रुग्णालयात कमी वेळेत पोहोचवणे शक्य झाले. तसेच रुग्णालयातील रिक्त बेडसाठी केंद्रीकृत डॅशबोर्ड बनविला आहे, ज्याचा फायदाही लोकांना झाला. असे निरीक्षण केंद्रीय आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी नोंदवले.

महाराष्ट्राला लॉकडाऊनचा फायदा झाला असल्याचे आरोग्य मंत्रालयाने नमूद केले आणि त्यासाठी पुण्याचे उदाहरण दिले. पुण्यानेही रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचेही आरोग्य मंत्रालयाने कौतुक केले आहे. पुण्याने विशेष प्रयत्न करुन रुग्ण बाधितांचे प्रमाण 69.7 टक्क्यां 41.8 टक्क्यांवर आणल्यामुळे पुण्याच्या प्ररुपाचे विशेष कौतुक केले गेले.