मुंबई शहरात 'ब्रेक द चेन' अंतर्गत नियम कडक करण्यात आले आहेत. पण आता नागरिकांमध्ये अजूनही नियमांची पायमल्ली करत अनावश्यक गर्दी करण्याचे प्रकार सुरूच असल्याने एस वॉर्डमध्ये दुकानांच्या वेळांवर मर्यादा घालण्यात आली आहे. टाईम्स ऑफ ईंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, एस वॉर्ड (S Ward) अर्थात पवई (Powai), भांडूप (Bhandup), कांजूरमार्ग (Kanjur Marg) या भागात अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेतच खुली ठेवली जाणार असल्याचं सांगण्यात आले आहे. दरम्यान यामधून मेडिकल स्टोअर्स केवळ अपवाद आहेत.
मागील काही दिवसांपासून अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी मंत्र्यांपासून प्रशासनापर्यंत अनेकांनी वारंवार विनंती करून देखील नागरिक मोठ्या प्रमाणात बाजारात गर्दी करत असल्याचं चित्र होतं. यामध्ये कोरोना रूग्णांची देखील दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने अखेर स्थानिक आमदार, नगरसेवक यांनी मिळून आता एस वॉर्ड मध्ये नियम कडक करण्याचे आदेश देत दुकानांच्या वेळा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुकानांच्या वेळेवर मर्यादा आली असली तरीही नागरिकांना ऑनलाईन किंवा होम डिलव्हरीच्या माध्यमातून सामान पोहचवण्याची मुभा दिली जाणार आहे.
एस वॉर्ड मध्ये अनेक दुकानं ही एकमेकांना खेटून असल्याने गर्दी होण्याचं प्रमाण अधिक आहे. पवई सारख्या परिसरामध्ये संध्याकाळच्या वेळेस सुपरमार्केटच्या बाहेर लांबच लांब रांगा पहायला मिळत होत्या तर अनेकजण संध्याकाळी वॉक साठी बाहेर पडत होते. यामध्ये अनेकजण अत्यावश्यक सेवेचं किंवा वस्तू खरेदीचं कारण सांगत टेहाळत असल्याचं दिसून आल्याने आता दुपारी 12 च्या नंतर दुकानं बंद करून केवळ होम डिलेव्हरी सुरू ठेवली जाणार आहे.