हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) वादावरून अटक करण्यात आलेल्या नवनीत राणा आणि रवी राणा (Navneet Rana and Ravi Rana) यांना अखेर बुधवारी 11 दिवसांनी सत्र न्यायालयातून जामीन मिळाला. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, मुंबई सत्र न्यायालयाने सांगितले की, अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा आरोप सिद्ध झालेला नाही. मुंबईतील विशेष न्यायालयाने म्हटले की, नवनीत राणा आणि पती रवी राणा यांनी निःसंशयपणे संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मर्यादा ओलांडली आहे, परंतु केवळ अपमानास्पद किंवा आक्षेपार्ह शब्दांची अभिव्यक्ती हे त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा आरोप सिद्ध होण्यास पुरेसे कारण नाही.
राणा पती पत्नी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. परंतु या जोडप्याच्या घोषणेचा हेतू हिंसक मार्गाने सरकार पाडण्याचा नव्हता, असेही न्यायालयाने म्हटले आहे. त्यांची विधाने सदोष असली, तरी त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली आणण्यासाठी ती पुरेशी नाहीत. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर.एन.रोकडे यांनी बुधवारी लोकप्रतिनिधी दाम्पत्याला जामीन मंजूर करताना ही टिपण्णी केली.
या आदेशाची सविस्तर प्रत शुक्रवारी उपलब्ध करून देण्यात आली. यामध्ये नमूद केले आहे की, सध्याच्या टप्प्यावर भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 124A (देशद्रोह) अंतर्गत प्रथमदर्शनी आरोप या जोडप्याविरुद्ध लावले जावू शकत नाहीत. गेल्या आठवड्यात मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जाला विरोध करत म्हटले होते की, त्यांची योजना गुन्ह्याचा हेतू दर्शवत नाही, परंतु प्रत्यक्षात राज्य सरकारला आव्हान देण्याचा त्यांचा मोठा कट होता. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवणे आणि नंतर महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे विद्यमान सरकार बरखास्त करण्याची मागणी करणे हा या योजनेचा उद्देश होता.
प्रक्षोभक विधाने करून सार्वजनिक अव्यवस्था निर्माण करण्याचा किंवा कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याची अपायकारक प्रवृत्ती किंवा हेतू असेल, तेव्हा देशद्रोहाची तरतूद केली जाते, असे पोलिसांनी म्हटले होते. मात्र, त्यावर न्यायालयाने म्हटले की, याचिकाकर्त्यांनी संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा ओलांडल्या आहेत, मात्र केवळ अपमानास्पद किंवा आक्षेपार्ह शब्दांची अभिव्यक्ती हे IPC च्या कलम 124A मध्ये समाविष्ट असलेल्या तरतुदींना लागू करण्यासाठी पुरेसे कारण असू शकत नाही. (हेही वाचा: राज ठाकरेंची विविध मुद्द्यांवरची आंदोलने 'अयशस्वी', राज्यावर आणि समाजावर विपरित परिणाम; Ajit Pawar यांची सडकून टीका)
दरम्यान, राणा दाम्पत्याने ते 23 एप्रिल रोजी वांद्रे उपनगरातील उद्धव ठाकरे यांचे खाजगी निवासस्थान मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर 23 एप्रिल रोजीच या दोघांनाही अटक करण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी त्यांच्या त्याच्यावर देशद्रोह आणि शत्रुत्वाला प्रोत्साहन देण्याच्या आरोपांसह आयपीसीच्या विविध तरतुदींखाली गुन्हा दाखल केला होता.