#CoupleChallenge ठरु शकतं धोकादायक; महाराष्ट्र पोलिसांनी दिला सतर्कतेचा इशारा (Watch Video)
Maharashtra Police on #CoupleChallenge (Photo Credits: Pixabay)

सध्याचा काळ हा सोशल मीडिया आणि ट्रेडिंगचा असल्यामुळे दरवेळेस सोशल मीडियावर वेगवेगळे ट्रेन्ड व्हायरल होत असतात. नेटकरी देखील उत्साहाच्या भरात यात सहभागी होतात. अशा सर्वांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. असे चॅलेंजेस स्वीकारणं धोकादायक ठरु शकतं. त्यामुळे असा चॅलेंजेसना बळी पडणं थांबवा, असा सतर्कतेचा इशारा महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police) दिला आहे. पोलिस उपनिरिक्षक सोमनाथ कदम यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावरील विविध चॅलेंजेस स्वीकारण्याचे दुष्परिणाम सांगितले आहेत.

व्हॅलेंटाईन डे जवळ येताच फेसबुकवर सध्या कपल चॅलेंज, आयु्ष्यभराचा जोडीदार चॅलेंज सुरु झालं आहे. यात आपल्या जोडीदारासोबतचा फोटो शेअर करत टॅग केलं जातं. अनेक कपल्सही यात अगदी आनंदाने आणि उत्साहाने सहभागी होतात. परंतु, कपल्स फोटोमध्ये जोडीदाराचा फोटो दुसऱ्यासोबत फोटोशॉप होण्याची शक्यता असते किंवा न्यूड फोटो लावून एडिटींग केलं जावू शकते. तसंच असे फोटोज व्हायरल केले जातात. यामुळे बदनामी तर होतेच पण वैवाहिक आयुष्यात अडचणी निर्माण होतात. ब्लॅकमेलिंग, आत्महत्या यांसारखे प्रकार घडतात. त्यामुळे असा चॅलेंजला बळी पडू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

पहा व्हिडिओ:

(हे ही वाचा: COVID19 च्या लसीबद्दल पाठवल्या जाणाऱ्या फेक लिंक बद्दल पोलिसांनी नागरिकांना केले सतर्क)

अलिकडच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूकीचे प्रकार सर्रास घडत असतात. याचा परिणाम पुढे हत्या, आत्महत्या यांसारख्या गुन्हांमध्ये होतो. त्यामुळे पोलिसांनी दिलेला सतर्कतेचा इशारा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तसंच सोशल मीडियावरील फसवणूकीला बळी न पडण्यासाठी विशेष खबरदारी घेणे देखील तितकेच आवश्यक आहे.