Coronavirus in India (Photo Credits: PTI)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. तर राज्यातील मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. याच दरम्यान आता मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कारण मुंबईतील कोविड19 चा डबलिंग रेट 29 दिवसांवर पोहचला आहे. याबाबत कोविड टास्क फोर्स मेंबर्स डॉ. शंशांक जोशी यांनी माहिती दिली आहे. तर 13 मे पासून कोरोना व्हायरसचा डबलिंग रेट हा 13 दिवसांवर पोहचल्याचे दिसून आले होते.

डबलिंग रेट 30 दिवसांवर पोहचल्याने रुग्णांसाठी लागणारे अतिरिक्त बेड्सची संख्या सुद्धा कमी झाल्याचे महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी म्हटले आहे. जर डबलिंग रेट 32 दिवसांवर पोहचल्यास सध्याच्या बेड्सची उपलब्धता असल्याच्या चौपट रुग्णांवर उपचार करण्यात येतील. सध्या मुंबई महापालिकेत कोविड19 च्या रुग्णांसाठी 11,500 बेड्स आहेत. तर नव्या डिस्चार्ज पॉलिसीनुसार रुग्णांची प्रकृती गंभीर नसल्यास त्यांना आता सात दिवसात घरी सोडण्यात येत आहे. मान्सूनच्या काळात कोरोना व्हायरस कशा पद्धतीने बदलेल याबाबत कोणत्याही अभ्यासाबाबत सुचवण्यात आलेले नाही. मुंबई महापालिकेने पुढे असे म्हटले आहे की, मंगळवार पर्यंत 11 शहारांमधील 24 वॉर्डमधील कोरोनाचा डबलिंग रेट 31 ते 60 दिवस आहे.(Coronavirus: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज ठाणे येथील COVID19 रुग्णालयाचे ऑनलाईन उद्घाटन)

दरम्यान, मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 61587 वर पोहचला आहे. तसेच 3244 जणांचा बळी गेला असून आतापर्यंत 31338 जणांची प्रकृती सुधारली आहे. कोरोना व्हायरसमुळे राज्यात येत्या 30 जून पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात काही नियम शिथील करण्यात आले आहेत. परंतु तरीही नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वत:सह परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.