Coronavirus: कोरोना व्हायरस संकटामुळे महाराष्ट्रात नोकर भरती होणार नाही, अनेक शासकीय योजना व विकासकामे थांबवली; विभागांना मिळणार फक्त 33 टक्के निधी
अजित पवार (Photo Credit : Twitter)

देशात कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा सर्वात जास्त परिणाम महाराष्ट्रावर (Maharashtra) झाला आहे. या साथीच्या आजारामुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतही मोठी घसरण झाली आहे. दरम्यान, सोमवारी महाराष्ट्र सरकारने पुढील वर्षी मार्चपर्यंत राज्यात कोणतेही नवीन विकासकामे (Development Works) सुरू होणार नसल्याचे जाहीर केले. तसेच सरकारने सर्व नवीन प्रकल्प गोठवले आहेत. कोणत्याही नव्या योजना सुरु होणार नाहीत किंवा नोकरभरती होणार नसल्याचे सरकारने सांगितले आहे. आर्थिक वर्षात महाराष्ट्र सरकार विकास योजनांवरील 67 टक्के खर्च कमी करेल. 1960 मध्ये राज्य स्थापनेनंतरची ही सर्वात मोठी कपात असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

दोन महिन्यांपूर्वी शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस सरकारने राज्यासाठी येथे 4.34 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. सन 2019-20 च्या तुलनेत या अर्थसंकल्पात 4.2 टक्क्यांनी वाढ करण्यात आली. चालू आर्थिक वर्षासाठी भांडवली खर्च 45124 कोटी ठेवण्यात आला आहे. मात्र आता कोरोना व्हायरस संकटामुळे निविदांवर बंदी घालण्याचे आदेश सरकारने आता सर्व विभागांना दिले आहेत. याशिवाय सर्व विभागीय बदल्यांवरही रोख लावण्यात आली आहे. याचा सर्वात मोठा परिणाम नोकर भरतीवर झाला आहे. फडणवीस सरकारच्या काळात 72,000 पदांसाठी नोकर भरती होणार होती, ती आता थांबवली गेली आहे.

सध्या फक्त सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, अन्न व नागरी पुरवठा आणि मदत व पुनर्वसन या विभागांनाच निधी पुरवण्यात येणार आहे. इतर विभागाला 33 टक्के इतकीच रक्कम दिली जाणार आहे. सर्व विभागांच्या सचिवांना सध्या सुरू असलेल्या सर्व योजनांचा आढावा घेण्यास सांगितले आहे. ज्या योजनांकडे दुर्लक्ष करता येणार नाही त्यांना प्राथमिकता देण्यास सांगण्यात आले आहे व ज्या योजना सध्या महत्वाच्या नाहीत त्यांना पुढे ढकलण्यात येणार आहे. तसेच नवीन कामाचे प्रस्तावही स्वीकारले जाणार नाहीत व आरोग्य खाते सोडून इतर कुठल्याही खात्याला बांधकाम न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (हेही वाचा: Coronavirus च्या पार्श्वभूमीवर मुंबई मध्ये 17 मे पर्यंत कलम 144 अंतर्गत संचारबंदी कायम- मुंबई पोलीस)

दरम्यान, महाराष्ट्रात काल, 4  मे रोजी नवे 771 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले तर 35 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 14 हजार 541 वर पोहचली आहे. यापैकी 2645 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर 583 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.