पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी देश 'लॉकडाऊन' (Lockdown) करण्यासाठी निवडलेल्या वेळेवरुन अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) नियंत्रणासाठी देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय आवश्यक होता. मात्र, त्यासाठी रात्री आठचीच वेळ निवडण्याचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित करुन टीका होऊ लागली आहे. शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र म्हणून ओळकल्या जाणाऱ्या दै. सामना ( Daily Saamana) संपादकीयातूनही असाच सवाल विचारण्यात आला आहे. रात्री आठची वेळ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काही पंचागी नाते आहे काय?, असे दै. सामना संपादकीयात म्हटले आहे.

'त्यांच्या चुली विझू नयेत!' या मथळ्याखाली लिहिलेल्या संपादकीयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे स्वागत करतानाच खोचक शब्दांत टोलेबाजीही करण्यात आली आहे. ''पुढचे एकवीस दिवस हिंदुस्थान संपूर्ण बंद राहील अशी घोषणा करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी अंतर्धान पावले आहेत. 'संपूर्ण बंद' जाहीर करण्यासाठी पंतप्रधानांनी पुन्हा एकदा रात्री आठ वाजताचा मुहूर्त धरला. आता लोकांच्या मनात दोनच प्रश्न निर्माण झाले हे मोजून 21 दिवसांचे गणित काय आहे? हा सरकारचा शुभांक आहे काय? आणि नोटबंदी जाहीर करण्यासाठी 'आठ'चीच वेळ मोदी यांनी साधली होती. तीच वेळ 'लॉकडाऊन' म्हणजे संपूर्ण बंद पुकारण्यासाठी का साधली? या दोन्ही वेळांशी मोदींचे काही पंचांगी नाते आहे काय?'', असा सवाल विचारण्यात आला आहे.

दरम्यान, ''हिंदुस्थानात 'कोरोना'चे संकट मोठे आहे. संसर्ग रोखण्यासाठी 'लॉक डाऊन' हाच एकमेव पर्याय आहे. हेसुद्धा मान्य. पण हे सर्व करण्यास उशीर झाला आहे. 21 दिवसांचे 'लॉक डाऊन' आजपासून 15 दिवसांपूर्वी जाहीर व्हायरला हवे होते. मंगळवारी पंतप्रधानांनी आठची वेळ साधली. त्यामुळे लोकांच्या पोटात भीतीचा गोळा उठला. पंतप्रधान 'आठ वाजता' येत आहेत ते बंदची घोषणा करण्यासाठीच हे नक्की होते. फक्त किती दिवस ते आधांतरी होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे मंत्री जयंत पाटील मोदींच्या बंदवर भडकले आहेत. बहुधा त्यांचे भडकणे ही जनभावना असू शकते'' असेही सामना संपादकीयात म्हटले आहे. (हेही वाचा, Coronavirus: मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे सोशल मीडियावर सुपर हिट; निर्णयक्षमता, प्रशासनावरील पकड यावर होतीय चर्चा)

''मोदींनी रात्री आठचा मुहूर्त साधला. 21 दिवसांचा बंद जाहीर केला. लोकांनी आता 21 दिवस घरीच बसायचे आहे. पण, खायचे काय? जगायचे कसे याचे मार्गदर्शन झालेले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिलासा दिला आहे. 'अन्नधान्याचा साठा भरपूर आहे. चिंता नसावी.' मुख्यमंत्री म्हणाले ते बरोबर आहे. पण, शेतकऱ्यांना कर्जमाफी करुन ज्याप्रमाणे दिलासा दिला त्याप्रमाणे ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांच्या घरात पुढील 21 दिवस चूल कशी पेटणार याचे गणित कोणी मांडले आहे काय? पंतप्रधान मोदी बंदची घोषणा करुन निघून गेले. पंतप्रधान किंवा इतर सत्ताधाऱ्यांना हातात शे-पाचशे रुपये घेऊन बाजारहाट करायला जावे लागत नाही. एक मोठा वर्ग असा आहे त्यांना 21 दिवस आनंदाचे, मजेचे, सुखाचे वाटू शकतात. मात्र, त्याच वेळी किमान 80 कोटी लोकांना 21 दिवस खायचे काय, खाण्यासाठी कमवायचे काय हे प्रश्न सतावतीत आहेत'', असेही दै. सामना संपादकीयात म्हटले आहे.

दरम्यान, ''केंद्र सरकारने आता दाररिद्र्य रेषेखालील लोकांना 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पुढील तीन महिने या निर्णयाचा लाभ देशातील 80 कोटी जनतेलाहोईल असे सरकारने मह्टले आहे. सरकारने हा निर्णय घेतला हे चांगलेच केले, पण धान्य गरीब जनतेला कसे मिळणार वैगेरे गोष्टींबाबत देखील खुलासा व्हायला हवा होता'', असा टोलाही दै. सामनातून लगावण्यात आला आहे.