बीड: कोरोनाच्या पार्श्वभुमीवर घराबाहेर थांबण्यास विरोध केल्याने पोलिसांना टोळक्याकडून मारहाण
बीड मध्ये टोळक्याकडून पोलिसांना मारहाण (Photo Credits-Twitter)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिव वाढू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वीच राज्यात संचारबंदी आणि जिल्ह्याच्या सीमा बंदचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांकडून पोकळ बांबूचे फटके सुद्धा दिले जात आहेत. याच पार्श्वभुमीवर आता बीड येथे घराबाहेर थांबण्यास पोलिसांनी नागरिकांना विरोध केला. यामुळे संतप्त झालेल्या टोळक्याने पोलिसांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

सिरसाळा मधील पोलीस गल्लोगली गस्त घालत होते. त्यावेळी वडार कॉलनीमधील काही जण घराच्या बाहेर थांबले असता त्यांना त्याबाबत विचारण्यात आले. यावर संतप्त झालेल्या एका व्यक्तीने पोलिसांवर लाकूड फेकून मारले. यावर पोलीस आणि तेथील काही जणांमध्ये वाद निर्माण होत एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात झाली. तर आरोपीच्या कुटुंबियांकडून पोलिसांना विटा आणि हाताने मारण्यास सुरुवात केली. हा सर्व नाट्यप्रकार जवळजवळ अर्धा तास सुरु होती. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Coronavirus: मुंबई पोलिसांकडून 1 करोड रुपयांची किंमत असलेले 200 मास्कचे बॉक्स जप्त, 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल)

दरम्यान, लॉकडाउनच्या परिस्थितीत पोलिसांकडून रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे कारणाशिवाय रस्त्यावर फिरणाऱ्यांना चांगलाच चोप पोलिसांकडून दिला जात आहे. ऐवढेच नाही तर पोलिसांनी लॉकडाउनची परिस्थिती जे लोक गांभीर्याने घेत नाही त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा सुद्धा दिला आहे.