मुंबई मध्ये Novel Coronavirus चे 2 संशयित रूग्ण; कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये राखीव वॉर्ड
Coronavirus Spread (Photo Credit: IANS)

चीन मध्ये थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसची भीती आता भारतामध्ये पसरायला सुरूवात झाली आहे. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, चीनमधून परतलेले दोन जण सध्या रूग्णालयात दाखल आहेत. त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. अशी माहिती मुंबई महानगर पालिकेच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. सध्या चीनमध्ये novel coronavirus मुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. Coronavirus याची चीन मध्ये झपाट्याने वाढत चालल्याने आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू.

सध्या मुंबईमध्ये इंटरनॅशनल विमानतळावर प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी खास यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच कोरोना व्हायरसच्या थैमानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील चिंचपोकळी परिसरातील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये विशेष वॉर्डची सोय करण्यात आली आहे. पीटीआय वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार पालिकेच्या खास वॉर्ड कोरोना व्हायरसचे निदान आणि उपचार करण्यासाठी आरक्षित असेल.

पालिकेच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, माईल्ड कफ आणि सर्दीशी निगडीत काही लक्षणं आढळल्याने संशयित रूग्णांना विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. चायनातून येणार्‍या रूग्णांना कोरना व्हायरसची लक्षण दिसताच रूग्णालयात पाठवण्याचे आदेश मुंबई विमानतळावरील डॉक्टरांना देण्यात आले आहेत. सोबतच शहरातील डॉक्टरांनादेखील कोरोना सदृश्य लक्षणं आढळल्यास त्याची माहिती पालिका रूग्णालयांना देण्याचं आवाहन केलं आहे.

कोरोना व्हायरसचे रूग्ण आढळल्यास त्यांच्यावर उपचार कसे करायचे याबाबतच्या सूचना महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आल्या आहेत. कोरोना व्हायरसमुळे सर्दी पडशापासून श्वसनाच्या विकारांचा धोका बळावला आहे. या व्हायरसमुळे चीनमध्ये मागील काही दिवसांत 25 जणांचा मृत्यू झाला आहे तर 250 हून अधिक लोकं रूग्णालयात दाखल झाले आहेत.