Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

राज्यातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा धोका अधिक वाढला आहे. काल (1 एप्रिल 2020) 335 इतका असलेला आकडा आज (2 एप्रिल 2020) 416 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोना बाधित रुग्णांच आकडा 81 ने वाढला आहे. एकट्या मुंबई शहरातच 57 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, दिलासादायक वृत्त असे की रुग्णलयात उपचार घेत असलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 42 जणांना प्रकृती सुधारल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.

केवळ महाराष्ट्रच नव्हे तर, देशातही कोरोना व्हायरस बाधित रुग्णांचा आकडा वाढतो आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, संपूर्ण देशात गेल्या 24 तासात 328 नव्या कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात कोरोना व्हायरस बाधित 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशभरात असलेल्या कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या आता 1965 इतकी झाली आहे. तर कोरोना व्हायरस बाधित मृत रुग्णांचा देशभरातील आतापर्यंतचा एकूण आकडा हा 50 इतका आहे. दिलासादायक वृत्त असे की, कोरोना व्हायरस संसर्ग झालेल्या 151 रुग्णांना आतापर्यंत उपचारांनी बरे करण्यात यश आले आहे.

एएनआय ट्विट

दरम्यान, महाराष्ट्रासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्राला आता कोरोना व्हायरस संसर्ग ओळखण्यासाठी आता रॅपीड टेस्ट करता येणार आहेत. केंद्र सरकारने राज्य सरकारला तशी मान्यता दिली आहे. या टेस्टमुळे एखाद्या व्यक्तीला कोरोना व्हायरस झाला आहे किंवा नाही हे अवघ्या 5 मिनिटांत समजू शकणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope) यांनी ही माहिती दिल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील राज्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. या संवादानंतर त्याबाबतची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली.