Coronavirus: मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये अन्यथा पोलिसांकडून कारवाई करावी लागेल- आरोग्यमंत्री राजेश टोपे
Maharashtra Health Minister Rajesh Tope (Photo Credits: ANI)

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून त्याच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. तर कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 400 च्या पार गेला आहे. याच कारणामुळे सर्वत्र लॉकडाउनचे आदेश देण्यात आले आहे. तर महाराष्ट्रात सुद्धा कोरोनाबाधितांचा आकडा 89 वर जाऊन पोहचल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.तर कोरोनाबाधित 89 पैकी 2 जण आयसीयूत असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे. तसेच राज्यात जमावबंदी सुद्धा लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी जर लॉकडाउनच्या परिस्थितीत नियम आणि कायद्यांचे उल्लंघन केल्यास पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.

राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील कोरोना व्हायरसच्या परिस्थिती आढावा घेतल्याची माहिती दिली आहे. तर यापूढे पत्रकार परिषदा घेणार नसून सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देण्यात येणार आहे. तसेच नागरिकांनी अत्यावश्यक सेवेशिवाय घराबाहेर पडू नये. मात्र जर नागरिकांनी गर्दी केल्यास पोलिसांकडून कारवाई करावी लागेल असे ही राजेश टोपे यांनी म्हटले आहे. सरकार सध्या कोरोनाची परिस्थिती ताब्यात आणण्यासाठी वारंवार प्रयत्न करत आहे. त्यामुळे येत्या 27 मार्चनंतर प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये लॅब सुरु करण्यात येणार आहे.(Coronavirus in Maharashtra: कोरोना विरुद्धचा लढा गंभीरपणे घेण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जनतेला आवाहन) 

तसेच मुंबईत कोरोनाचे 14 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळेमधुमेह, टीबी, बीपी रुग्णांनी अधिक काळजी घ्यावी असे आवाहन राजेश टोपे यांनी नागरिकांना केले आहे. कोरोनाला घाबरुन जाऊ नका पण काळजी घ्या. तसेच रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या नागरिकांनी स्वत:ची अधिक काळजी घ्यावी. राज्यात सध्या 6 प्रयोगशाळेत कोरोनाची तपासणी सुरु असून गोवा सीमा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.