Coronavirus: मुंबई-पुणे महामार्गावर अत्यावश्यक सेवा लिहिलेल्या टेम्पो मधून 25-30 जणांची वाहतूक
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने येत्या 14 एप्रिल पर्यंत पूर्णपणे लॉकडाउनचे आदेश देण्यात आले आहेत. तर देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 600 च्या पार गेल्याने ही गांभीर्याची स्थिती असून आपण सध्या फेज 2 मधून जात आहोत. मात्र या लॉकडाउनच्या दिवसात नागरिकांना अत्यावश्यक सेवासुविधा सुरु राहणार आहेत. परंतु गोरगरिबांचे या काळात खुप हाल होत आहेत. त्यामुळे काही जणांनी आपल्या घरची वाट पकडली आहे. तर आज मुंबई-पुणे महामार्गावर अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या एका टेम्पो मधून 20-30 जणांची वाहतूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर अत्यावश्यक सेवा लिहिलेला दुधाचा टेम्पो जात होता. त्या दरम्यान नाकाबंदी असताना पोलिसांनी टेम्पोला अडवत त्याचे बंद असलेले शटर उघडण्यास सांगितले असता त्यामध्ये 20-30 केळी विकणाऱ्या महिला बसल्याचे दिसून आले. यासंदर्भात टेम्पो चालकाला विचारले असता त्याने महिलांनी त्यांना टेम्पोतून पुण्याला घेऊन जाण्यासाठी जबरदस्ती केल्याचे म्हटले आहे. नागरिकांना गर्दी करु नये असे आवाहन केले असले तरीही असे प्रकार सध्या घडत आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे.(Coronavirus In Maharashtra: पुणे शहरात क्राईम ब्रांच कडून मास्कचा काळाबाजार करणार्‍यांवर धाड; दोघांविरोधात गुन्हा दाखल)

दरम्यान, ज्यांचे हातावर पोट आहे त्यांचे लॉकडाउनच्या काळात हाल होत असल्याने त्यांनी आपल्या घरची वाट पकडली आहे. कोणी दुधाच्या गाडीतून लपून, कोणी चालत तर कोणी टेम्पोतून दाटीवाटी करत प्रवास करत आहेत. कोरोनाचे देशावरील संकट हे अतिशय भयंकर असून त्याचा सामना करण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. तर पुण्यात 32 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून 10 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.